श्रीनगर - जम्मू काश्मीर पोलीस आणि लष्कराने संयुक्त कारवाईत करत रेसाई जिल्ह्यातील दहशतवादी तळ उद्ध्वस्त केला. सलधार भागातील दुर्गम जंगल भागात ही कारवाई केली. सुरक्षा दलांनी दगडाच्या कपारीत लपवून ठेवलेला मोठा शस्त्रसाठा जप्त केला आहे. गुप्त माहितीच्या आधारे सुरक्षा दलांनी ही कारवाई केली.
गुप्त माहितीच्या आधारे कारवाई -
गुप्त माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दलांनी सलधार भागात शोधमोहिम राबवली होती. काश्मिरातील शांतता भंग करण्याचा पाकिस्तानातील दहशतवाद्यांचा प्रयत्न आम्ही पुन्हा एकदा उधळून लावला आहे. दहशतवादी हल्ल्यासाठी वापरण्यात येणारा हा शस्त्रसाठा दुर्गम भागात गुप्तपणे ठेवण्यात आला होता.
एके-४७ सह ग्रेनेड साठा जप्त -
पाकिस्तानातील बालाकोट येथील दहशतवादी तळावर एअर स्ट्राईकच्या केल्याच्या घटनेला दोन वर्ष पूर्ण झाले त्याच दिवशी सुरक्षा दलांना शस्त्रसाठा सापडला. पाक पुरस्कृत दहशतवादाला समूळ नष्ट करण्यासाठी जम्मू काश्मीर पोलीस आणि लष्कराने कठोर पावले उचण्यास सुरू केले आहे. जप्त केलेल्या या साठ्यात ऐके ४७ रायफल, आरपीजी लॉन्चर, १६ ग्रेनेड आणि दोन रेडिओ सेट आहेत, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
अनंतनाग जिल्ह्यातही शस्त्रसाठा जप्त -
२१ फेब्रुवारीला जम्मू काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यात सुरक्षा दलाच्या संयुक्त पथकाने मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त केला होता. सकाळच्या वेळी ही कारवाई करण्यात आली होती. अटक केलेल्या संशयित आरोपींकडून सुरक्षा दलांना शस्त्रसाठ्याबद्दल माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी मोहिम राबवत ही कारवाई केली होती.