नवी दिल्ली - टुलकिट प्रकरणातील संशयित आरोपी शंतनू मुळकच्या याचिकेवर दिल्लीतील पटियाला न्यायालयात आज (बुधवार) सुनावणी होणार आहे. अटकपूर्व जामीन मिळावा यासाठी त्याने याचिका दाखल केली आहे. औरंगाबाद खंडपीठाकडून मिळालेल्या अटकपूर्व जामीनाची मुदत २६ मार्चला संपत आहे. त्याआधीच पुन्हा जामीन मिळावा यासाठी शंतनूने अर्ज दाखल केला आहे. अतिरिक्त सत्र न्यायाधीश धरमेंद्र राणा यांच्या पीठासमोर या प्रकरणाची सुनावणी होणार आहे. शेतकरी आंदोनाबाबत टुलकिटद्वारे देशाची प्रतिमा मलिन होईल, अशी खोटी माहिती पसरवल्याप्रकरणी दिल्ली पोलिसांनी मुळकवर गुन्हा दाखल केला आहे.
शंतनू मुळक, दिशा रवी यांची एकत्र चौकशी -
या प्रकरणी बंगळुरूतील पर्यावरणवादी कार्यकर्ती दिशा रवीवरही पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. मात्र, तिला अटकपूर्व जामीन मिळाला आहे. दिल्ली पोलिसांच्या सायबर सेलने दिशा रवी आणि शंतनू मुळक या दोघांची एकत्र चौकशी केली. दोघांनीही शेतकरी आंदोलनाच्या आधी एका व्हिडिओ कॉन्फरन्सिंगला हजेरी लावली होती. ही ऑनलाइन कॉन्फरन्स 'पोएटिक जस्टिस फाऊंडेशन' या संस्थेने आयोजित केली होती. या संघटनेचा खलिस्तानी चळवळीला पाठिंबा असून त्यांच्याशी दिशा रवी, आणि शंतनू मुळक यांचे संबध असल्याचा आरोप पोलिसांनी केला आहे.
दिशा रवीला जामीन मंजूर -
काल मंगळवारी दिल्लीतील न्यायालायने दिशा रवीला जामीन मंजूर केला. शेतकरी आंदोलासंबंधी टुलकिट प्रसारित केल्याप्रकरणी तिच्यावर गुन्हा दाखल केला होता. ३ फेब्रुवारीला स्वीडीश पर्यावरणवादी कार्यकर्ती ग्रेटा थुनबर्गने हे टुलकिट शेअर केले होते. मात्र, हे ट्विट नंतर थुनबर्गने डिलीट केले होते. दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला तिने पाठिंबा दिला आहे. मुंबई येथील वकील निकिता जेकब यांच्यावरही पोलिसांनी टुलकिट पसरवल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. मात्र, त्यांची जामिनावर सुटका झाली आहे.