नवी दिल्ली - कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेने देशभरात थैमान घातलेलं आहे. देशात सलग दुसऱ्या दिवशी दोन लाख नव्या कोरोनाबाधितांची भर पडली. केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांच्या नेतृत्वात 11 सर्वाधिक प्रभावित राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या आरोग्य मंत्र्यांसह उच्चस्तरीय बैठक घेण्यात आली. राज्य सरकारांनी रेमडेसिवीर , ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटरचा पुरवठा करण्याची मागणी केंद्राकडे केली. देशात कोरोना लसीची कमतरता नाही, असे हर्षवर्धन यांनी सांगितले. तसेच वाढत्या कोरोना रुग्णांच्या संख्येवर हर्षवर्धन यांनी चिंता व्यक्त केली. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला हलक्यात घेऊ नका, कोरोनाबाबत गंभीर असण्याची गरज आहे, असे ते म्हणाले.
देशात आज सकाळपर्यंत 14 कोटी 15 लाख लसीचे डोस पुरवण्यात आले आहेत. वेस्टेजसह सर्व राज्यांनी सुमारे 12.57 दशलक्ष 18 हजार लस वापरल्या आहेत. देशात लसीची कमतरता नाही. राज्यांजवळ एक कोटी 58 लाख डोस आहेत, असे हर्षवर्धन यांनी सांगितले.
सुमारे तीन तास महाराष्ट्र, छत्तीसगड, राजस्थान, गुजरात, मध्य प्रदेश, केरळ, पश्चिम बंगाल, दिल्ली, कर्नाटक, तामिळनाडू आणि उत्तर प्रदेशच्या आरोग्य मंत्र्यांशी चर्चा केली. ऑक्सिजन आणि रेमडेसिवीर उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याची माहिती केंद्रीय मंत्री हर्षवर्धन यांनी दिली.
एक लाख ऑक्सिजन सिलिंडर खरेदी -
महाराष्ट्राला 1,121, उत्तर प्रदेश 1,700, झारखंड 1,500, गुजरात 1,600, मध्य प्रदेश 152 आणि छत्तीसगढ 230 व्हेंटिलेटर पुरवण्यात येत आहेत. केंद्र सरकार देशभरातील अनेक रुग्णालयांमध्ये ऑक्सिजन विकसित करीत आहे. 'गेल्या वर्षी आम्ही एक लाख सिलिंडर खरेदी केले होते आणि राज्यांना विनाशुल्क पुरवले होते. पुन्हा एक लाख सिलिंडर खरेदी करण्यात येत आहेत. ऑक्सिजन एका राज्यातून दुसर्या राज्यात नेण्याच्या प्रक्रियेत कोणतीही अडचण येणार नाही, असेही त्यांनी सांगितले.
देशातील कोरोना रुग्णांची परिस्थिती -
देशात कोरोना रुग्णांची संख्या वेगाने वाढत आहे. अनेक राज्यांमध्ये ऑक्सिजनचा तुटवडा जावणत आहे. रेमडेसिवीर इंजेक्शनचाही तुटवडा आहे. यामुळे काही राज्यांमध्ये स्थिती बिकट बनत चालली आहे. आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, भारतात गेल्या 24 तासांत 2,34,692 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर 1,341 जणांचा मृत्यू झाला आहे. ही आजपर्यंतची सर्वात मोठी एकदिवसीय आकडेवारी आहे. त्यामुळे एकूण रुग्णांची संख्या 1,45,26,609 वर पोहचली आहे. तर गेल्या शुक्रवारी 2,17,353 आणि गुरुवारी 2,00,739 रुग्णांची नोंद झाली. तर आतापर्यंत 11,99,37,641 जणांना लस टोचवण्यात आली आहे.
हेही वाचा - नागरिकांना वाचवा! केंद्रीय मंत्री अश्विनी कुमार यांचे सर्वोच्च न्यायालयाला पत्र