अहमदाबाद - प्रेमात चंद्रतारे तोडून आणण्याचं वचन अनेक प्रेमीयुगले एकमेकांना देत असतात. माझं काळीजही तुला देईल असंही काही प्रेमवीर छातीठोकपणे म्हणतात. गुजरातमधील एका प्रेमवेड्याने व्हॅलेंटाईन डे ला आपल्या पत्नीला अनोखी भेट दिली. या व्यक्तीने पत्नीला स्वत:चे काळीज नाही दिले. मात्र, आपल्या पत्नीचे हृदय धडधडत राहील याची काळजी घेतली. अहमदाबादमधील एका व्यक्तीने आपल्या आजारी पत्नीला व्हॅलेंटाईनच्या दिवशी किडनी दान केली आहे. विशेष म्हणजे लग्नाचा २३ वा वाढदिवस आणि व्हॅलेंटाईन डे एकाच दिवशी येतो.
तीन वर्षांपासून किडनीच्या आजाराने त्रस्त -
रिता पटेल ही महिला किडनीच्या आजाराने मागील काही वर्षांपासून ग्रस्त आहे. तीन वर्षांपासून त्यांच्यावर औषधउपचार सुरू आहेत. मात्र, किडनीची कार्यक्षमता कमी होत गेली. त्यानंतर पती विनोद पटेल यांनी पत्नीला किडनी देण्याचा निर्णय घेतला. दोघांच्याही वैद्यकीय तपासण्या करण्यात आल्या. सर्व रिपोर्ट चांगले आल्याने आता पत्नीला किडनी देण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. अहमदाबादमधील एका खासगी रुग्णालयात आज व्हॅलेंटाईन डे च्या दिवशी किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे.
इतर अवयवांना संसर्ग होण्याचा धोका -
रिता यांची किडनी काम करत नसून मागील ३ वर्षांपासून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या आजारामुळे त्यांच्या इतर चांगल्या अवयवांना संसर्ग होण्याचा धोका वाढला आहे. त्यामुळे दुसरी कडनीही रिकामी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे रविवारी त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. पहिल्यांदाच आम्ही व्हॅलेंटाईन डे च्या दिवशी शस्त्रक्रिया करत आहोत. त्यामुळे आम्ही अत्यंत उत्साहात आहोत, असे त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉ. सिद्धार्थ मनावी यांनी सांगितले.
व्हॅलेंटाईन डे ला दिला संदेश -
माझी पत्नी तीन वर्षांपासून किडनीच्या आजाराने त्रस्त आहे. मागील १ महिन्यापासून डायलेसिस सुरू करण्यात आले आहे. तिचा त्रास पाहून मी किडनी देण्याचा निर्णय घेतला. पत्नी सध्या ४४ वर्षांची आहे. प्रत्येकाने आपल्या जोडीदाराचा सन्मान करावा आणि जेव्हा गरज असेल तेव्हा मदतीला धावून यावे, असा संदेश समाजात मला द्यायचाय, असे विनोद पटेल म्हणाले.