गांधीनगर : गुजरात विधानसभेने गुरुवारी लव्ह जिहाद विरोधी विधेयक मंजूर केले. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी हे विधेयक मंजूर करण्यात आले. २००३च्या धर्म स्वातंत्र्य कायद्यामध्ये सुधारणा करुन त्यात लव्ह जिहादचा मुद्दा जोडण्यात आला होता.
सत्तेत असणाऱ्या भाजपानेच हे विधेयक विधानसभेत मांडले होते. यामध्ये लग्नाचे वा इतर आमिष दाखवून जबरदस्तीने धर्मपरिवर्तन करायला लावणाऱ्यांना शिक्षा देण्याची तरतूद करण्यात आली आहे. विधिमंडळ कार्यमंत्री प्रदीपसिंह जडेजा यांनी हे विधेयक सभागृहात मांडले.
काय आहेत तरतुदी?
- लग्नानंतर वा लग्नाचे आमिष दाखवू धर्मांतर करायला लावणाऱ्या व्यक्तीस आणि तिला मदत करणाऱ्या व्यक्तीस कमीत कमी तीन आणि जास्तीत जास्त पाच वर्षांची शिक्षा, तसेच दोन लाख रुपये दंड.
- पीडित व्यक्ती जर अल्पवयीन, महिला वा एससी/एसटी प्रवर्गातील असेल तर गुन्हेगारास कमीत कमी चार आणि जास्तीत जास्त सात वर्षांची शिक्षा, तसेच तीन लाख रुपये दंड.
- अशा प्रकारच्या लग्नाला एखाद्या संस्थेने मदत केलेली आढळल्यास, त्या संस्थेच्या पदाधिकाऱ्यांना कमीत कमी तीन आणि जास्तीत जास्त १० वर्षांची शिक्षा, तसेच पाच लाखांपर्यंत दंड.
- या कायद्यांतर्गत दाखल झालेला गुन्हा अजामीनपात्र असेल, आणि पोलीस उपअधीक्षक वा त्यावरील हुद्द्याच्या अधिकाऱ्याने याचा तपास करणे अपेक्षित आहे.
हेही वाचा : जाती-धर्माच्या भिंती मोडून कोल्हापूरात पार पडला हिंदू-मुस्लिम विवाह सोहळा