मुंबई - गेली काही आठवडे भाजीपाल्याचे दर स्थिर असल्याने वाढत्या महागाईतही नाशिककरांना अल्पसा दिलासा मिळत होता. परंतु उन्हाळ्यामुळे भाजीपाल्यावर परिणाम झाला आहे. तसेच वाढत्या उन्हामुळे बाजारात दाखल झालेला भाजीपालाही लवकर खराब होत आहे. यामध्येही प्रामुख्याने टोमॅटो आणि गवारचे दर वाढले असून भेंडी, वांगी, शेवगा, हिरवी मिरची, कारली या भाज्या ८० रुपये प्रतिकिलो मिळत आहे. तर, दोडका, गिलके ६० रुपये किलो आहेत. फ्लॉवरच्या आणि कोबीच्या एका गड्ड्याची किंमत १५ ते २० रुपये झाली आहे. फळभाज्यांसह पालेभाज्यांचेही दर चांगलेच वधारलेले आहेत.
शंभरीपार होण्याची शक्यता - लवकरच पावसाळा सुरुवात होणार आहे. पावसामुळे शेतमालाचे मोठे नुकसान होते, याचबरोबर ओल्याव्यामुळे भाजीपालाही लवकर खराब होते. त्यामुळे आवकेवर मोठा परिणाम होत असल्याने दरवर्षी पावसाळ्यात भाज्यांचे दर वधारलेले असतात. यंदा हे दर शंभरीपार जाण्याची शक्यता व्यावसायिकांकडून व्यक्त केली जात आहे.
धान्याचे दर - मूग डाळ 126 रुपयांवरून 120 रुपये प्रती किलो झाली आहे. तूरडाळ 90 रुपये किलोवरून 80 रुपये झाली आहे. उडीद डाळ 135 रुपयांवरून 100 रुपयांवर आली आहे. तांदूळ व ज्वारीचे दर मात्र स्थिर आहेत. मसूर डाळ 58 रुपयांवरून 75 रुपये किलो एवढी वाढली आहे. मसाल्याचे दर वाढले आहेत. स्थानिक गूळ 48 रुपये किलोने विकला जात आहे.
नवी मुंबईत दर उतरले - अवकाळी पाऊस आणि घटत्या उत्पन्नाचा थेट परिणाम भाजीपाल्याच्या किमतींवर होत आहे. मात्र आज मागील आठवड्याच्या तुलनेत भाजीपाला स्वस्त झाल्याचे पाहायला मिळाले. आवक वाढल्यामुळे भाजीपाल्याचा भाव उतरला आहे. जरी भाजीपाल्याचा भाव मागील आठवड्याच्या तुलनेत उतरला असला तरी तो सर्वसामान्यांच्या आवाक्यात यायला आणखी काही वेळ लागणार आहे. पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किंमती, अवकाळी पाऊस आणि घटती आवक यामुळे भाजीपाल्याचा भाव गगनाला भिडला होता. मात्र काही प्रमाणात आज भाजीपाला स्वस्त झाल्याने नवी मुंबईकर सुखावलेत.
हेही वाचा - Petrol Diesel Rates Today: पेट्रोल डिझेलच्या दरात चढ-उतार कायम; वाचा नवे दर