श्रीनगर ( जम्मू-काश्मीर ) - प्रजासत्ताक दिन ( Republic Day ) एक दिवसावर येऊन ठेपला आहे. अशात श्रीनगर येथील हरि सिंह हाई स्ट्रीट या गजबजलेल्या परिसरात काही दहशतवाद्यांनी सुरक्षा दलाच्या पथकावर ग्रेनेड हल्ला केला. हा हल्ला मंगळवारी (दि. २५ जानेवारी) दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास झाला. या हल्ल्यात चार जण जखमी झाले असून सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही, अशी माहिती येथील प्रशासकीय अधिकाऱ्यांनी दिली आहे.
प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंधेला झालेल्या हल्ल्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. सुरक्षा दलाच्या जवानांवर दहशतवाद्यांनी ग्रेनेड हल्ला केला. ग्रेनेड रस्त्याच्या कडेला फुटला. या घटनेत चार जण जखमी झाले आहे. मोहम्मद शफी, त्यांची पत्नी तनवीरा व एक महिला अस्मत, असे तीन सामान्य नागरिक व पोलीस निरीक्षक तनवीर हुसैन हे चौघे जखमी असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. संपूर्ण परिसर वेढला असून हल्लेखोरांचा शोध सुरू आहे. प्रजासत्ताक दिन निर्विघ्नपणे पार पडावा यासाठी श्रीनगर शहर व काश्मीर खोऱ्यातील सुरक्षा वाढवण्यात आली आहे.