नवी दिल्ली - भारताच्या सॅटलाईट प्रोगामला नवी दिशा देणारे भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे माजी प्रमुख (इस्रो) आणि आंतरराष्ट्रीय ख्यातीचे शास्त्रज्ञ उडुपी रामचंद्र राव यांचा आज 89 वा जन्मदिवस आहे. जयंतीनिमित्त गुगलने डुडलच्या माध्यमातून त्यांना मानवंदना दिली. भारताचा पहिला उपग्रह असलेल्या ‘आर्यभट्ट’च्या निर्मितीत राव यांचे मोठे योगदान होते. 24 जुलै 2017 रोजी 85व्या वर्षी प्राध्यापक राव यांचं निधन झालं.
उडुपी रामचंद्र राव यांचा जन्म कर्नाटकातील दक्षिण कॅनरा जिल्ह्यातील अदमारू या खेड्यात झाला. म्हैसूरमधील शिक्षणानंतर त्यांनी मद्रासला विज्ञानात पदवी, बनारस विद्यापीठातून पदव्युत्तर पदवी व गुजरात विद्यापीठातून पीएच.डी. असे शिक्षण घेतले. नंतर ते अवकाशयानांच्या अभ्यासासाठी अमेरिकेला गेले. अमेरिकेतील एमआयटी संस्थेत शिक्षण घेतल्यानंतर डलास येथील टेक्सास विद्यापीठात त्यांनी अध्यापन केले. 1966 मध्ये भारतात येऊन अहमदाबादच्या फिजिकल रीसर्च लॅबोटरीत ते संशोधन करू लागले. तेव्हा डॉ. विक्रम साराभाई यांच्या मार्गदर्शनाखाली देशाने पहिला आर्यभट्ट हा उपग्रह सोडला.
इस्रोचे अध्यक्ष तर भारताचे अंतराळ सचिवही -
भारताने 450 कोटी रुपयांतील परवडणारी मंगळ मोहीम राबवली व फत्तेही केली. त्याच्या पडद्यामागचे सूत्रधार डॉ. रावच होते. या मंगळ मोहिमेची घोषणा मनमोहन सिंग यांनी केली तेव्हा सिंग पंतप्रधान होते. यू.आर. राव यांनी 1984 ते 1994 या काळात भारताच्या अवकाश कार्यक्रमाचे नेतृत्व केले. दहा वर्षे ते अवकाश खात्याचे सचिव व इस्रोचे अध्यक्ष होते. ‘आर्यभट्ट’नंतर त्यांच्या नेतृत्वाखाली भास्कर, अॅपल, रोहिणी, इन्सॅट आदी श्रेणींचे किमान वीस उपग्रह तयार झाले.
पद्मविभूषण पुरस्काराने गौरवण्यात आलं -
भारतीय अवकाश संशोधन क्षेत्रात राव यांना अनन्य साधारण महत्त्व दिले जाते.अवकाश संशोधन क्षेत्रातील त्यांच्या भरीव कामगिरीमुळे त्यांना पद्मभूषण पुरस्काराने देखील गौरवण्यात आले आहे. वॉशिंग्टन येथील ‘सॅटेलाइट हॉल ऑफ फेम ऑफ द सोसायटी ऑफ सॅटेलाइट प्रोफेशनल्स इंटरनॅशनल’ या संस्थेत समावेश झालेले यू.आर. राव हे पहिले भारतीय आहेत. इंटरनॅशनल अॅकॅडमी ऑफ अॅस्ट्रॉनॉटिक्सचा थिओडोर व्हान करमान पुरस्कार त्यांना देण्यात आला आहे. तर युरी गागारिन पुरस्कारही त्यांच्या नावे आहे.