पणजी - गोवा विधानसभेच्या दोन दिवसीय अधिवेशनाला आजपासून (सोमवारी) सुरुवात झाली. पहिल्याच दिवशी कोविडच्या दुसऱ्या लाटेत मृत पावलेल्या नागरिकांच्या मृत्यूची जबाबदारी घेऊन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी गोवा फॉरवर्डचे नेते विजय सरदेसाई यांनी केली. मात्र त्यांची मागणी धुडकावून लावत विधानसभा अध्यक्षांनी विधानसभेचे कामकाज रेटून नेले. त्यावेळी गोवा फॉरवर्डच्या नेत्यांनी सभागृह त्याग केला.
'हिम्मत असेल तर मुख्यमंत्र्यांनी माझी प्रकरणे बाहेर काढावीत'
आपण मनोहर पर्रिकर यांच्या खांद्याला खांदा लावून आमदार, मंत्री म्हणून काम केले. आपण कधीही भ्रष्टाचार केला नाही. जर मुख्यमंत्र्यांना आपल्या भ्रष्टाचाराचे पुरावे मिळाल्यास त्यांनी बिनधास्त आपली प्रकरणे बाहेर काढावीत, असे खुले आव्हान गोवा फॉरवर्डचे नेते विजय सरदेसाई यांनी मुख्यमंत्री डॉ. सावंत यांना दिले आहे.
'आपण राजकारणात मुरलेला गडी'
मी मागच्या अनेक वर्षांपासून आमदार आहे, मंत्री झालो. मात्र मनोहर पर्रिकर यांनी कधी आपल्याला अशा धमक्या दिल्या नाहीत. मुख्यमंत्री राजकारणात नवे आहेत. त्यामुळे त्यांनी सबुरीने घ्यावे. आम्ही तोंड उघडले तर तुम्हाला महागात पडेल, असेही सरदेसाई म्हणाले. मागच्या आठवड्यात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह राज्याच्या दौऱ्यावर आले. तेव्हा त्यांनी कार्यकर्ता मेळाव्यात मुख्यमंत्र्यांनी शाह यांच्यासमोर विनाकारण आपल्या वाटेला आल्यास शिंगावर घेण्याची भाषा केली होती. त्याला सरदेसाई यांनी आज प्रत्युत्तर दिले होते.
हेही वाचा - तेव्हा या कांचन माँ कुठे होत्या ?, नवं हिंदुत्व ब्रिटीशांपेक्षाही भारी पडेल - किशोरी पेडणेकर