पणजी - कोविड-19चे संक्रमण हळूहळू वाढत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे गोवा सरकारतर्फे पर्यटन खात्याच्या माध्यमातून सरकारी पातळीवर साजरा केला जाणारा शिमगोत्सव रद्द करण्यात आल्याची घोषणा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आज विधानसभेत केली. त्याबरोबर मंदिरात धार्मिक पद्धतीने होणारा शिमगोत्सव कमीत कमी लोकांच्या उपस्थितीत साजरा करावा, असे आवाहनही त्यांनी आज विधानसभेत केले.
अर्थसंकल्पीय अधिवेशन
गोवा विधानसभेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. आज खासगी ठरावावार चर्चा होणार आहे. तत्पूर्वी सभागृहाचे कामकाज सुरू झाल्यानंतर महाराष्ट्रावादी गोमंतक पक्षाचे आमदार रामकृष्ण ढवळीकर यांनी शून्य प्रहरात कोविडच्या पार्श्वभूमीवर सरकारची भूमिका काय, असा प्रश्न उपस्थित केला. ढवळीकर सरकार शिमगोत्सव साजरा करणार अथवा नाही. जर आयोजन केले असेल तर कोणकोणत्या ठिकाणी होणार आहे आणि जर रद्द केला तर यामध्ये सहभागी होणारे रोमटामेळ आणि अन्य मंडळे यांनी शिमगोत्सव सहभागासाठी केलेली तयारी वाया जाणार आहे, अशा स्थितीत सरकार त्यांना नुकसानभरपाई देणार आहे काय? या प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी पर्यटनमंत्री मनोहर आजगावकर उभे राहिले.
'अजून निर्णय नाही'
अजून निर्णय झालेला नाही. कोरोना संक्रमण विचारात घेतले पाहिजे तसेच लोकांनाही सांभाळले पाहिजे. याबाबत संध्याकाळपर्यंत सरकारचा निर्णय होईल, असे सांगत असताना मुख्यमंत्री डॉ सावंत यांनी याविषयी आपण बोलतो असे सांगून, म्हणणे सभागृहात मांडले.
'नुकसानभरपाई देणार'
डॉ. सावंत म्हणाले, की राज्यात कोविड रुग्णांची संख्या हळूहळू वाढत आहे. त्यामुळे सरकारी पातळीवर होणारा शिमगोत्सव रद्द करण्यात येत आहे. त्यामुळे यासाठी सहभागी होणाऱ्या मंडळांना नुकसानभरपाई दिली जाईल. त्याबरोबरच मंदिरात धार्मिक पद्धतीने होणारे शिमगोत्सव कमीत कमी लोकांच्या उपस्थितीत साजरे केले जावेत. त्यासाठी सरकारच्या परवानगीची आवश्यकता नाही. हे करत असताना मास्क-सॅनिटायझर-शारीरिक अंतर याकडे लक्ष दिले पाहिजे. त्याबरोबरच सर्वच महोत्सव मर्यादित लोकांच्या उपस्थितीत साजरे केले गेले पाहिजेत. दरम्यान, गोव्यातील पारंपरिक आणि धार्मिक पद्धतीने साजरा होणारा शिमगोत्सव हा स्थानिकांबरोबरच पर्यटकांसाठी आकर्षणाचे असतात. गोव्याच्या प्रत्येक गावातील शिमगोत्सव हा वैशिष्ट्यपूर्ण असतो. काही ठिकाणी पारंपरिक पद्धतीने शिमगोत्सव सुरू झाले आहेत.