पणजी - राज्यात येणाऱ्या पर्यटकांना सर्वच सुविधा एकाच छताखाली उपलब्ध करून देण्यासाठी राज्य सरकारच्या पर्यटन विभागाने ऑनलाइन पर्यटन सुविधा केंद्राचे उद्घाटन आज केले. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि पर्यावरण पर्यटन मंत्री रोहन खंवटे यांच्या उपस्थितीत या सुविधा केंद्राचे उद्घाटन करण्यात आले.
ऑनलाइन टुरिझम सर्विसेस - राज्यात येणाऱ्या पर्यटकांना सर्वच सुविधा एका क्लिकवर उपलब्ध करून देण्यासाठी पर्यटन विभागाच्यावतीने ऑनलाइन टुरिझम सर्विसेस हा विशेष कक्ष उभारण्यात आला आहे. यांच्यामार्फत राज्यात येणाऱ्या सर्व पर्यटकांना एका क्लिकवर राज्यातील सर्व पर्यटन सुविधा उपलब्ध होणार आहेत.
सर्वच व्यावसायिकांना एकाच छताखाली - राज्यात पर्यटन क्षेत्रात काम करणाऱ्या सर्व व्यावसायिक हॉटेलधारक छोटे-मोठे व्यवसायिक तसेच पर्यटक यांना एकाच छताखाली आणून त्यांच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी तसेच व्यावसायिकांच्या व्यवसायाला चालना देण्यासाठी या पर्यटन सुविधा केंद्राचे उद्घाटन करण्यात आल्याचे मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी सांगितले.
राज्यात यंदापासून मान्सून पर्यटन होणार सुरू - गोव्यात 365 ही दिवस पर्यटक येत असतात त्यामुळे गोवा हे एक आंतरराष्ट्रीय पर्यटन क्षेत्र आहे. त्यामुळे अशा या पर्यटन क्षेत्रात पर्यटकांना वर्षभर पर्यटनाच्या दृष्टीने विविध सोयी उपलब्ध करून देण्यासाठी यंदाच्या मान्सुन मोसमात मान्सून पर्यटन ही नवी संकल्पना सुरू करणार असल्याचे पर्यटन मंत्री रोहन खंवटे यांनी सांगितले.