दिल्ली/नोएडा Ganesh Visarjan २०२३ : काल (२८ सप्टेंबर) संपूर्ण देशात गणेश विसर्जनाची धूम होती. ठिकठिकाणी भक्तांनी आपल्या लाडक्या बाप्पाला मोठ्या जल्लोषात निरोप दिला. मात्र या दरम्यान दिल्लीजवळील नोयडामध्ये एक मोठी दूर्घटना घडली. यामुळे या उत्साहाला गालबोट लागलंय.
चार भाऊ यमुना नदीत बुडाले : नोएडामध्ये यमुना नदीत गणेशाच्या मूर्तीचं विसर्जन करण्यासाठी गेलेले चार भाऊ गुरुवारी नदीत बुडाले. नदीतील दलदलीत अडकल्यानं हा अपघात झाल्याचं सांगण्यात येत आहे. या चौघांनाही दलदलीतून बाहेर काढून चाइल्ड पीजीआय हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. मात्र हॉस्पिटलमध्ये पोहोचेपर्यंत १५ वर्षीय धीरज आणि ६ वर्षीय कृष्णा यांना जीव गमवावा लागला. इतर दोघे भाऊ, सचिन आणि अभिषेक यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. सचिनची प्रकृती चिंताजनक आहे.
दलदलीत फसल्यानं अपघात झाला : एससीपी रजनीश वर्मा यांनी या प्रकरणी अधिक माहिती दिली. नोयडाच्या सेक्टर २० परिसरातील निठारी गावात राहणारा धीरज कुटुंब आणि मित्रांसह गणेश मूर्तीचं विसर्जन करण्यासाठी यमुना नदीच्या किनारी पोहचला होता. दरम्यान, हे चार भाऊ आंघोळीसाठी नदीत उतरले. मात्र नदीच्या काठावर दलदल होती. त्यात पडल्यानं चौघेही बुडू लागले. त्यांच्यासोबत असलेल्या लोकांनी त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला. लोकांनी चौघांनाही कसंबसं बाहेर काढलं.
दोघा जणांचा मृत्यू : त्यानंतर या सर्वांना चाइल्ड पीजीआय रुग्णालयात आणण्यात आलं. मात्र तिथे डॉक्टरांनी नीरज आणि कृष्णाला मृत घोषित केलं. तर सचिनची प्रकृती चिंताजनक असल्याचं सांगण्यात येत आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ घटनास्थळ गाठून पुढील कारवाई सुरू केली आहे.
हेही वाचा :