हैदराबाद : विनायक दामोदर सावरकर हे नाव जगभरात त्यांच्या भारतीय स्वातंत्र्याच्या लढ्यात दिलेल्या योगदानामुळे सुपरिचित आहे. मात्र गणेश उर्फ बाबाराव सावरकर या नावाला फारसे वलय नसल्याचे दिसून येते. गणेश सावरकर हे विनायक सावरकर यांचे बंधू होते. त्यांनी इंग्रजविरोधातील केलेल्या कारवायांमुळे त्यांनाही काळ्या पाण्याची शिक्षा ठोठावण्यात आली होती. गणेश सावरकर यांचे आणखी एक महत्वाचे काम म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पाच संस्थापकापैंकी ते एक होते.
भगूरमध्ये झाला जन्म : गणेश सावरकर यांचा जन्म भगूरमध्ये १३ जून १८७९ ला झाला होता. त्यांचे प्राथमिक शिक्षणही भगूरमध्येच पार पडले होते. मात्र त्यांच्या आईच्या निधनानंतर प्लेगच्या बिमारीने त्यांच्या वडिलांचेही निधन झाले. त्यामुळे गणेश सावरकर खचून गेले. संन्यास घेण्याचा त्यांचा निर्णय त्यामुळे रद्द करावा लागला. त्यांच्यावर त्यांच्या दोन्ही लहान भावांची जबाबदारी आली. त्यानंतर त्यांनी आपल्या दोन्ही भावांचे पालन पोषण करत भारतीय स्वातंत्र्य लढ्यात योगदान दिले.
अभिनव भारत सोसायटीची केली स्थापना : विनायक दामोदर सावरकर यांचे मोठे भाऊ असलेल्या गणेश सावरकर यांनी १९०४ मध्ये विनायक सावरकर यांच्यासोबत मिळून अभिनव भारत सोसायटीची स्थापना केली होती. या संस्थेच्या माध्यमातून ते भारतीय स्वतंत्र्य लढ्याच्या चळवळीचे नियोजन करत होते. मात्र विनायक दामोदर सावरकर हे आपल्या शिक्षणासाठी इंग्लंडला गेल्यानंतर गणेश सावरकर यांनी या संस्थेच्या माध्यमातून निधी गोळा करुन स्वातंत्र्य सैनिकांचे साहित्य अभिनव भारतच्या माध्यमातून प्रकाशित करुन ते प्रसिद्ध करत होते. त्यामुळेच १९०९ मध्ये गणेश सावरकर यांच्यावर ब्रिटीश सैन्याने पाळत टेवली होती.
ब्रिटीश सैन्याने ठोठावली काळ्या पाण्याची शिक्षा : भारतीय स्वातंत्र्य लढ्याची चळवळ चालवल्यामुळे ब्रिटीश सैन्याने गणेश सावरकर यांना अटक करून त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला. त्यांना काळ्या पाण्याची शिक्षा ठोठावून अंदमानच्या कारागृहात पाठवण्यात आले. त्यामुळे गणेश सावरकर यांना अंदमानातील कोठडीत आपले जीवन व्यतीत करावे लागले. मात्र १९२१ मध्ये ब्रिटीश सैन्याने त्यांना अंदमानातून काढून साबरमतीच्या कारागृहात त्यांची रवानगी केली. त्यानंतर त्यांना एक वर्ष साबरमतीच्या कारागृहात ठेवल्यानंतर त्यांची १९२२ मध्ये सुटका करण्यात आली.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्थापनेत सहभाग : गणेश सावरकर यांची अंदमानातून साबरमतीला रवानगी झाल्यानंतर त्यांची ब्रिटीश सैन्याने सुटका केली. मात्र गणेश सावरकर यांना स्वातंत्र्याची चळवळ स्वस्थ बसू देत नव्हती. याच काळात त्यांची भेट केशव बळीराम हेडगेवार यांच्यासोबत झाली. केशव बळीराम हेडगेवार हे कट्टर हिंदुत्ववादी होते. त्यांच्या सपंर्कात आल्यानंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा आराखडा बनवला. त्यामुळे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्थापनेत त्यांचा महत्वाचा वाटा असल्याचे बोलले जाते. गणेश सावरकर यांनी दुर्गानंद के छद्म या नावाने पुस्तक प्रकाशित केले होते. मात्र ब्रिटीश सरकारने ते जप्त केले. त्यांनी अनेक पुस्तकही प्रकाशित केले आहे. अशा थोर देशभक्ताचे १६ मार्च १९४५ मध्ये निधन झाले. ईटीव्ही भारतच्या वतीने थोर देशभक्त असलेल्या गणेश सावरकर यांना त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त भावपुर्ण अभिवादन.
हेही वाचा - National Vaccination Day 2023 : गोवरमुळे जातो हजारो बालकांचा बळी, अशी घ्या आपल्या चिमुकल्यांची काळजी