हैदराबाद : Ganesh Chaturthi 2023 यंदा गणेश चतुर्थी 19 सप्टेंबरला आहे. यावेळी गणेश चतुर्थीच्या दिवशी वैधृती योग, स्वाती नक्षत्र आणि विशाखा नक्षत्र यांचा योगायोग असून तो अतिशय शुभ आहे. असं मानलं जाते की, या दहा दिवसांमध्ये श्रीगणेश आपल्या भक्तांच्या सुखाच्या मार्गातले सर्व अडथळे दूर करतो. दहा दिवसांच्या कालावधीत विघ्नहर्ता आपल्या भक्तांच्या आयुष्यातल्या विघ्नांचा नाश करुन गणपती बाप्पा विसर्जित होतात. पुढच्या वर्षी गणपती पुन्हा येईल या प्रार्थनेसह असंख्य भाविक अनंत चतुर्दशीच्या दिवशी बाप्पाच्या मूर्तीचं विसर्जन करतात.
2023 मध्ये गणेश उत्सव कधी सुरू होईल आणि कधी संपेल ? हिंदू पौराणिक कथेनुसार, श्रीगणेशाचा जन्म हिंदू कॅलेंडरप्रमाणे, भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षात झाला, हा उत्सव ग्रेगोरियन कॅलेंडरमध्ये ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यात येतो. यावर्षी, गणेश चतुर्थीचा उत्सव मंगळवार, 19 सप्टेंबर, 2023 रोजी आहे. लंबोदर काही ठिकाणी दीड दिवस, पाच दिवस, सात दिवस तर काही ठिकाणी अनंत चतुर्दशीपर्यंत भाविकांचा पाहुणचार घेणार आहे.
गणेशोत्सवाचा इतिहास : छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासूनच हा सण मोठ्या थाटात साजरा केला जातो. काही काळानंतर हा उत्सव पुन्हा बाळ गंगाधर टिळकांनी लोकांना एकत्र आणण्यासाठी आणि त्यांच्यातील जातीयवादाची दरी कमी करण्यासाठी केला होता. त्यांनी १८९३ मध्ये गिरगावात केशवजी नाईक चाळ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ हे पहिलं मंडळ स्थापन केलं. राष्ट्रवादाची भावना जागृत करण्यासाठी त्यांनी उत्सवादरम्यान गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना करण्याची परंपराही सुरू केली. लोकांचा असा विश्वास आहे की, सार्वजनिक ठिकाणी गणपतीची मोठी मातीची मूर्ती बसवणारे ते पहिलेच धुरीण होते.
गणेश चतुर्थीची वेळ : हिंदू दिनदर्शिकेनुसार, गणेश चतुर्थी 2023 सोमवार, 18 सप्टेंबर रोजी दुपारी 12:39 वाजता सुरू होणार आहे आणि मंगळवारी, 19 सप्टेंबर रोजी रात्री 8:43 वाजता समाप्त होणार आहे. गणेश पूजा मुहूर्त सकाळी 11:01 ला सुरू होईल आणि दुपारी 01:28 पर्यंत असेल. 2 तास आणि 27 मिनिटांचा हा कालावधी असेल.
गणेशोत्सवाचा कालावधी : उत्सवाच्या पहिल्या दिवशी लोक घरोघरी गणेशमूर्ती बसवून गणपती बाप्पाचे स्वागत करतात. भक्त गणेशमूर्तीला सजवतात आणि पूजा करतात. नंतर तीन, पाच किंवा दहा दिवसांनी मूर्ती पाण्यात विसर्जित करून त्याला निरोप देतात.
हेही वाचा :
- Ganesh Festival 2023 : दरवर्षी सजावट करणाऱ्या नितीन देसाईंचा पडला नाही विसर... लालबागचा राजा मंडळ वाहणार अनोखी श्रद्धांजली
- Ganesh Festival २०२३ : आयुक्तांच्या आदेशाला केराची टोपली; गणेशमूर्तीवर शिक्के न मारण्याचे महापालिकेला आदेश
- Ganpati Festival 2023: यंदा अधिक मासामुळे बाप्पाचे आगमन लांबले; 'या' दिवशी होणार बाप्पाचे आगमन