श्रीनगर : 5 ऑगस्ट 2019 रोजी केंद्र सरकारने कलम 370 आणि 35-A हटवून जम्मू-काश्मीरचा विशेष दर्जा रद्द केला. सरकारने राज्याचे विभाजन जम्मू-काश्मीर आणि लडाख या दोन केंद्रशासित प्रदेशांमध्ये केले. सरकारच्या या धाडसी निर्णयाला आज चार वर्षे पूर्ण झाली आहेत.
पीडीपीच्या नेत्यांना ताब्यात घेतले : सत्ताधारी पक्ष भारतीय जनता पार्टी आज कलम 370 हटवल्याचा आनंद साजरा करत आहे. पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टीनेही श्रीनगर जिल्हा प्रशासनाकडे एक सेमिनार आयोजित करण्याची परवानगी मागितली होती, मात्र त्यांना परवानगी नाकारण्यात आली. पीडीपीच्या प्रमुख मेहबूबा मुफ्ती यांनी काल प्रशासनाच्या या पक्षपाती वृत्तीवर प्रश्न उपस्थित केले. 'पोलीस आमच्या पक्षाच्या नेत्यांना ताब्यात का घेत आहेत?, असा सवाल त्यांनी केला. दरम्यान, पक्षाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, वाहिद पारा, गुलाम नबी हंजुरा, मुहम्मद यासीन आणि अब्दुल रौफ भट यांच्यासह सुमारे दहा पीडीपी नेत्यांना काल रात्री ताब्यात घेण्यात आले.
मेहबूबा मुफ्ती नजरकैदेत? : पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टीच्या अध्यक्षा मेहबूबा मुफ्ती यांनी शनिवारी दावा केला की त्यांना आणि त्यांच्या पक्षाच्या काही वरिष्ठ नेत्यांना नजरकैदेत ठेवण्यात आले आहे, तर इतर अनेकांना ताब्यात घेण्यात आले आहे. मेहबुबा यांनी ट्विट केले की, 'आज मला आणि माझ्या पक्षाच्या इतर वरिष्ठ नेत्यांना नजरकैदेत ठेवण्यात आले. शनिवारी मध्यरात्री पक्षाच्या अनेक नेत्यांना पोलिसांनी बेकायदेशीरपणे ताब्यात घेतल्यानंतर ही कारवाई करण्यात आली.
कलम 370 हटवल्यानंतर दीर्घकाळ कडक निर्बंध : कलम 370 हटवल्यानंतर या भागात दीर्घकाळ कडक निर्बंध होते. निर्बंधांदरम्यान प्रदेशातील दळणवळण यंत्रणा अनेक महिने बंद ठेवण्यात आली होती. या दरम्यान स्थानिक राजकीय नेत्यांनाही ताब्यात घेण्यात आले होते. विशेष म्हणजे जम्मू-काश्मीरचे तीन माजी मुख्यमंत्री, डॉ. फारूख अब्दुल्ला, ओमर अब्दुल्ला आणि मेहबूबा मुफ्ती हेही कोठडीत होते. आता सर्वोच्च न्यायालयाने तब्बल चार वर्षांनंतर कलम 370 रद्द करण्याच्या विरोधातील याचिकांवर सुनावणी सुरू केली आहे.
दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक : कलम 370 हटवण्याला चार वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर दक्षिण काश्मीरच्या कुलगाम जिल्ह्यात काल संध्याकाळी दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक झाली. यात तीन जवान गंभीर जखमी झाले, ज्यांचा नंतर लष्कराच्या रुग्णालयात मृत्यू झाला. मात्र, सध्या श्रीनगर शहरातील परिस्थिती सामान्य आहे. शाळा, दुकाने, कार्यालये पूर्वीप्रमाणे सुरू आहेत. रस्त्यांवर वाहनांची वाहतूकही सुरळीत आहे.
हेही वाचा :