नवी दिल्ली - एपीजे अब्दुल कलाम मार्गावरील इस्रायलच्या दूतावासाबाहेर 29 जानेवरीला स्फोट झाला होता. याप्रकरणी चार विद्यार्थ्यांना कारगिलमधून अटक करण्यात आली असून त्यांना ट्रान्झिट रिमांडवर दिल्लीला आणण्यात आले आहे. अनेक तासांच्या चौकशीनंतर त्याला अटक करण्यात आली. संबंधित तरुण दिल्लीमध्ये शिक्षण घेत होते.
दिल्लीतील इस्रायलच्या दूतावासाबाहेर 29 जानेवरीला स्फोट झाला होता. एका फुलदानीत हा बॉम्ब ठेवण्यात आला होता. भारत आणि इस्रायल राजनैतिक संबंधांना 29 वर्ष पूर्ण झाल्याच्या दिवशी हा स्फोट झाला. जैश-उल-हिंद या दहशतवादी संघटनने या स्फोटाची जबाबदारी स्वीकारली होती. या संघटनेबाबतची माहिती राष्ट्रीय तपास यंत्रणेकडून मिळवण्यात येत आहे. तसेच घटनास्थळावरून एक धमकीचे पत्रही पोलिसांना मिळाले होते. या पत्रातील माहितीतून स्फोटामागे इराण कनेक्शन असल्याचे समोर आले होते. 'हा स्फोट फक्त एक ट्रेलर आहे, असे पत्रात म्हटले होते. भविष्यात आणखी हल्ले करणार असल्याचा अप्रत्यक्ष इशारा पत्रातून देण्यात आला होता.
पायी चालत जाऊन ठेवला बॉम्ब -
पोलिसांनी दूतावास परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता, दोन युवक कॅबमधून येत असल्याचे दिसले. स्फोट झाला त्या घटनास्थळावरून काही अंतर दूर ते युवक उतरले. त्यानंतर काही अंतर पायी चालत त्यांनी स्फोटके ठेवली. या स्फोटात चार ते पाच गाड्यांच्या काचा फुटल्या होत्या. मात्र, कोणतीही जीवीतहानी झाली नाही. इस्राईलच्या दूतावासापासून 150 मीटर अंतरावर हा स्फोट झाला. या स्फोटानंतर इस्रायलच्या दूतावासाची सुरक्षाही वाढवण्यात होती आणि परिसर सील करण्यात आला होता.