नवी दिल्ली - पाकिस्तानच्या बालाकोट येथील दहशतवादी तळांवर हवाई हल्ल्यात भारतीय सैन्याने 26 फेब्रुवारी 2019 रोजी 300 दहशतवाद्यांचा खात्मा केला होता. पाकिस्तानने आतापर्यंत याचे खंडण केले होते. मात्र पाकचे माजी राजदूत जफर हिलाली यांनी ही कबुली दिली आहे. त्यामुळे प्रथमच पाककडून अतिरेक्यांचा खात्मा झाल्याची कबुली मिळाली आहे.
पाक सरकारने केले होते खंडण
एका टीव्ही कार्यक्रमात त्यांनी ही कबुली दिली आहे. जफर हिलाली यांनी उर्दू वृत्तवाहिनीवरील चर्चेदरम्यान कबूल केले, की 26 फेब्रुवारी 2019 रोजी बालाकोटमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटात 300हून अधिक दहशतवादी ठार झाले. टीव्ही चर्चेत नियमितपणे पाकिस्तानी सैन्याची बाजू घेणारे माजी पाकिस्तानी राजदूत हिलाली यांचा हा दावा तत्कालिन पाकिस्तान सरकारच्या दाव्याच्या विरोधात आहे.
जीवितहानी झाली नसल्याचा दावा खोटा
बालाकोट हवाई हल्ल्यानंतर पाकिस्तानने असा दावा केला होता, की बॉम्बस्फोटात कोणतीही जीवितहानी झाली नाही आणि भारतीय सैन्याने एक निर्जन जागेवर हवाई हल्ला केला.
'आम्हाला वाटले तसे नव्हते'
हिलाली म्हणाले, की भारताने आंतरराष्ट्रीय सीमा ओलांडली आणि युद्ध छेडण्याचे काम केले, ज्यामध्ये किमान 300 लोक ठार झाले. आमचे ध्येय त्यांच्यापेक्षा वेगळे होते. आम्ही त्यांच्या (भारत) हायकमांडला लक्ष्य केले. कारण तो लष्करातील व्यक्ती होता. सर्जिकल स्ट्राइक ही भारताकडून होणारी नेहमीची बाब आहे. यात कोणतीही जीवितहानी होण्याची शक्यता नाही, असे आम्हाला वाटले होते, असे ते म्हणाले.
26 फेब्रुवारी 2019रोजी झाला होता एअरस्ट्राइक
जम्मू-काश्मीरच्या पुलवामा येथे 14 फेब्रुवारी 2019रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्याला उत्तर म्हणून भारतीय हवाईसेनेने 26 फेब्रुवारी रोजी पाकिस्तान व्याप्त काश्मीरमध्ये हवाई हल्ले केले. यात हवाईदलाच्या 12 मिरजेस-2000 लढाऊ विमानांनी बालाकोट, चकोटी आणि मुझफ्फराबादमध्ये बॉम्बहल्ले केले. त्यात 300हून अधिक दहशतवादी ठार झाले. हवाई दलाने या संपूर्ण मोहिमेचे नाव 'ऑपरेशन बंदर' असे ठेवले होते.