बंगळुरू (कर्नाटक) : एका खासगी कंपनीच्या एमडी आणि सीईओची मंगळवारी संध्याकाळी बंगळुरुमधील (Former Employee Kills MD CEO) अमृथल्लीच्या पंपा कॉलनीजवळ शस्त्रांनी निर्घृण हत्या करण्यात आली आहे. फणींद्र सुब्रह्मण्य आणि विनू कुमार अशी या हत्या झालेल्या एमडी आणि सीईओंची नावे आहेत. फेलिक्स असे आरोपीचे नाव आहे. आरोपी हा खासगी कंपनीचा माजी कर्मचारी होता. हत्या केल्यानंतर आरोपी फरार झाला आहे.
कंपनीच्या वादातून हत्या - फणींद्र सुब्रमण्य आणि विनू कुमार अशी मृतांची नावे आहेत. ते एरोनिक्स मीडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचे एमडी आणि सीईओ पदावर कार्यरत आहेत. आरोपी हा एअरॉनिक्स कंपनीमध्ये काम करत होता. मात्र, स्वतःची कंपनी सुरू करण्यासाठी या कंपनीतील त्याने नोकरी सोडली होती. नोकरी सोडल्यानंतर आरोपीने दुसरी कंपनी सुरू केली होती. मात्र, त्या कंपनीत मृत दोघेही अडथळा आणत असल्याने आरोपीने त्यांच्या हत्येचा कट रचला असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
आरोपी फरार - आरोपी फेलिक्सने मंगळवारी दुपारी चारच्या सुमारास मृतांच्या कंपनीच्या ऑफिसध्ये प्रवेश केला. त्यानंतर आरोपीने फणींद्र आणि विनू यांच्यावर शस्त्राने हल्ला केला. यात दोघांचा जागीच मृत्यू झाला. हल्ला केल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून पळून गेला. सध्या आरोपी फरार असून आम्ही त्याचा शोध घेत असल्याची माहिती डीसीपी लक्ष्मी प्रसाद यांनी दिली आहे. अमृतहल्ली पोलीस घटनास्थळी पोहोचले असून त्यांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.
पोलीस तपास सुरू - घटनेची माहिती लगेच पोलिसांना देण्यात आली होती. त्यानंतर लगेच स्थानिक पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी घटनास्थळाची पाहणी करत काही सीसीटीव्ही देखील ताब्यात घेतले आहेत. या घटनेनंतर परिसरात दहशतीचे वातावरण पसरले आहे. याप्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहेत.
हेही वाचा -