नवी दिल्ली - हिमाचल प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते वीरभद्र सिंह यांचे वयाच्या 87 व्या वर्षी निधन झाले. प्रदीर्घ आजाराशी झुंज दिल्यानंतर त्यांनी आज (गुरुवारी) सकाळी शिमला येथील इंदिरा गांधी मेडिकल कॉलेज आणि रुग्णालयात (आयजीजीएमसी) अखेरचा श्वास घेतला. याची पुष्टी आयजीएमसीचे एमएस डॉ. जनक राज यांनी केली आहे. वीरभद्र सिंह यांच्या निधनामुळे राज्यावर शोककळा पसरली आहे.
वीरभद्र सिंह यांची 30 एप्रिलपासून आयजीएमसीमध्ये दाखल केले होते. 10 जून रोजी त्याचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला होता. सोमवारीपासून वीरभद्र सिंहची प्रकृती खालावली होती. त्याला कार्डियोलॉजी विभागातील डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवले गेले होते. श्वास घेण्यात अडचण येत असल्याने त्यांना व्हेंटिलेटर सपोर्ट देण्यात आला होता. मात्र, गुरुवारी सकाळी त्यांचा मृत्यू झाला.
भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा, मुख्यमंत्री जय राम ठाकूर यांच्यासह अनेक मंत्री व नेतेही सोमवारी सकाळी वीरभद्र सिंग यांच्या प्रकृतीबाबत विचारपूस करण्यासाठी आयजीएमसी येथे पोहोचले होते.
चार वेळा हिमाचल काँग्रेसचे अध्यक्ष -
वीरभद्र सिंग यांचा जन्म 23 जून 1934 साली हिमाचल प्रदेशात झाला. वीरभद्र सिंह सहा वेळा हिमाचलचे मुख्यमंत्री होते. मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वात 28 मे 2009 ला ते पोलादमंत्री होते. तर 1962, 1967, 1972, 1980 आणि 2009 मध्ये लोकसभेवर निवडून गेले होते. आपल्या 47 वर्षांच्या राजकीय कारकीर्दीत ते 13 निवडणुका लढले आणि सर्व जिंकले. ते चार वेळा हिमाचल काँग्रेसचे अध्यक्षही राहिले होते.
लाच घेतल्याचा होता आरोप -
वीरभद्र सिंह यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत. एका प्रकल्पासाठी खासगी वीज कंपनीला मुदतवाढ दिल्याबद्दल वीरभद्र यांनी लाच घेतल्याचा आरोप आहे. राजकारणाशिवाय सिंह विविध सामाजिक आणि सांस्कृतिक संस्थांशी जोडलेले होते. ते संस्कृत साहित्य संमेलनाचे अध्यक्ष आणि सोव्हिएत युनियनच्या फ्रेंड ऑफ हिमाचल प्रदेश शाखेचे अध्यक्ष होते.