नवी दिल्ली - केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज (शनिवार) अर्थसंकल्पावर लोकसभेत उत्तर देणार आहेत. सकाळच्या सत्रात लोकसभेत अर्थसंकल्पावर चर्चा होणार असून १० वाजता अर्थसंकल्पातील तरतुदींबाबत त्या सभागृहापुढे उत्तर देणार आहेत. केंद्राच्या अर्थसंकल्पावर काँग्रेससह सर्वच विरोधी पक्षांनी सडकून टीका केली आहे. त्यामुळे आज सीतारामन बोलताना सभागृहात गदारोळ होण्याची शक्यता आहे.
अर्थसंकल्पीय अधिवेशनाचे पहिले सत्र आज होणार समाप्त -
शनिवारी अर्थसंकल्पीय अधिवेशनाचे सकाळचे सत्र पूर्ण होत आहे. शुक्रवारी अर्थमंत्री सीतारामन यांनी राज्यसभेत उत्तर दिले. यावेळी त्यांनी विरोधकांवर टीका केली. सरकार फक्त धनिकांसाठीच काम करत असल्याचा खोटा प्रचार विरोधक करत आहेत. सरकारच्या अनेक योजना या गरिबांसाठी असल्याचे ते म्हणाले. प्रधानमंत्री आवास योजना, प्रधान मंत्री सौभाग्य योजना यांच्यासह अनेक योजना सरकार गरिबांच्या कल्याणासाठी राबवत असल्याची आठवण त्यांनी सभागृहाला करून दिली.
केंद्र सरकारने मांडलेल्या अर्थसंकल्पातून आत्मनिर्भर भारतचे स्वप्न साकार होणार असून सरकार शाश्वत विकासाचे ध्येय गाठण्याचा प्रयत्न करत असल्याचे त्या म्हणाल्या. १ फेब्रुवारी रोजी निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्प सादर केला.