भोपाळ - मध्य प्रदेशच्या निवाडीमध्ये पाच वर्षीय मुलगा बोअरवेलमध्ये पडला असून त्याला बाहेर काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. बुधवारी खेळता-खेळता तो अचानक बोअरवेलमध्ये पडला. हे बोअरवेल 200 फूट खोल आहे. गेल्या 46 तासांपासून त्याला वाचण्यासाठी रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे.
एनडीआरएफची टीम बोगदा खोदत असून मुलापर्यंत पोहचण्यासाठी प्रयत्न करत आहे. मात्र, बोगदा खोदत असताना, पाणी येत असल्याने अडचण निर्माण होत असल्याचे जिल्हाधिकारी आशीष भार्गव यांनी सांगितले. प्रह्लाद असे मुलाचे नाव असून त्याला बाहेर काढण्यासाठी आणखी 6 ते 7 तास लागणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
प्रह्लादला श्वास घेता यावा, म्हणून बोअरवेलमध्ये ऑक्सिजन पाइप सोडण्यात आला आहे. संबधित परिसरमध्ये कलम 144 लागू करण्यात आले असून युद्धस्तरावर रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे.
यापूर्वीही अशाच घटना
यापूर्वीही अशाच घटना समोर आल्या आहेत. 28 मे रोजी बोअरवेलमध्ये अडकलेल्या तीन वर्षांच्या चिमुकल्याचा मृत्यू झाला होता. तेलंगणातील मेडक जिल्ह्यात ही घटना घडली होती. चिमुकल्यासाठी ऑक्सिजन पुरवण्याची व्यवस्था एनडीआरएफकडून करण्यात आली होती. मात्र या चिमुकल्याची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली होती. तसेच 21 फेब्रुवरी 2019 ला पुण्यातील मंचर येथे 200 फूट बोअरवेलमध्ये एक मुलगा पडला होता. तब्बल 15 तास प्रयत्न केल्यानंतर मुलाला बोअरवेलबाहेर सुखरूप काढण्यात आले होते.