नेल्लोर (आंध्र प्रदेश) : आंध्र प्रदेशच्या नेल्लोर जिल्ह्यातील तोडेरू शांतीनगरमध्ये मोठी दुर्घटना घडली. गावच्या तलावात बोट बुडाल्याने मौजमजेसाठी गेलेल्या 10 तरुणांपैकी सहाजण बेपत्ता झाले आहेत. तर चार तरुण किनाऱ्यावर सुखरूप पोहोचले आहेत. रविवारी संध्याकाळपासून तेथे जोरदार वारे वाहत आहेत. सोमवारी दुपारपर्यंत पाच मृतदेह सापडले आहेत.
चार जण वाचले : नेल्लोर जिल्ह्यातील टोडेरू, पोदालकुरू मंडल येथे ही दुर्घटना घडली. रविवारी सायंकाळी गावातील तलावात बोटीत मासेमारीसाठी गेलेले 10 युवक बोट उलटल्याने पाण्यात पडले. यातील चार जण पोहून किनाऱ्यावर आले तर मन्नूर कल्याण (३०), अली श्रीनाथ (१६), पती सुरेंद्र (१६), पमुजुला बालाजी (२०), बट्टा रघु (२५) आणि छल्ला प्रशांतकुमार (२६) हे हरवले होते. पोलिसांनी त्यांचा शोध सुरू केला आहे. सोमवारी दुपारपर्यंत मन्नूर कल्याण (30), अली श्रीनाथ (16), पमुजुला बालाजी (20), बट्टा रघु (25) आणि छल्ला प्रशांतकुमार (26) यांचे मृतदेह सापडले होते. सुरेंद्र या बेपत्ता व्यक्तीचा शोध सुरू आहे.
अंधारामुळे बचाव कार्यात अडथळे : घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी अग्निशमन दलाच्या जवानांसह बुडणाऱ्यांचा शोध सुरू केला. तलावात मोठ्या प्रमाणात गाळ असल्याने अंधारामुळे बचावाचे कार्य खोळंबले होते. मध्यरात्रीपर्यंत तरुणांचा ठावठिकाणा लागला नव्हता. नेल्लोरचे जिल्हाधिकारी चक्रधर बाबू आणि एसपी विजय राव हे मदतकार्यावर निरीक्षण ठेऊन आहेत. रविवारी रात्रीपासून एसपी विजया राव यांनी पोलिस आणि अग्निशमन दलाच्या जवानांसोबत हजर राहून त्यांना सूचना दिल्या.
बंगळुरुमध्ये तरुणीची आत्महत्या : बंगळुरुमध्ये रविवारी रात्री 16 ते 18 वर्षे वयाच्या एका विद्यार्थ्यीनीने अपार्टमेंटच्या 10 व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. मृत तरुणी शहरातील संजय नगर येथील रहिवासी आहे. चालुक्य सर्कल येथील एचपी अपार्टमेंटच्या 10 व्या मजल्यावरून तीने खाली उडी मारली. उडी मारताच ती परिसरात पार्क केलेल्या एका कारवर पडली. खाली पडून तिच्या शरीरातून प्रचंड रक्तस्त्राव झाला. यामुळे तिचा मृत्यू झाला, असे पोलिसांनी सांगितले.
पोलिसांचा तपास सुरू : आत्महत्या करणाऱ्या मुलीचे वडील हे सॉफ्टवेअर इंजिनीअर असून तिची आई ही गृहिणी आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मृत तरुणीचे कुटुंब एचपी अपार्टमेंटमध्ये राहत नाही जिथे तिने आत्महत्या केली. आत्महत्या करण्यापूर्वी त्या तरुणीने दुसऱ्या अपार्टमेंटमध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न केला होता, परंतु तेथील सुरक्षारक्षकांनी तिला आत जाऊ दिले नाही. तरुणीने आत्महत्येचे टोकाचे पाऊल का उचलले हे अद्याप समजू शकलेले नाही. पोलिसांचा याप्रकरणी तपास सुरू आहे. बंगळुरुच्या हाय ग्राऊंड पोलिस ठाण्यात या प्रकरणी गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.