जयपूर - राजस्थानातील भरतपूर जिल्ह्यात अती प्रमाणात दारू प्यायल्याने पाच जणांचा संशयितरित्या मृत्यू झाला आहे. जास्त दारू प्यायल्यानंतर पाचही जण आजारी पडल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान सर्वांचा मृत्यू झाल्याचे पोलिसांनी सांगितले.
शवविच्छेदन करण्याआधीच चौघांवर अंत्यसंस्कार
यातील चार मृतांवर कुटुंबीयांनी अंत्यसंस्कार केल्याने त्यांचे शवविच्छेदन करता आले नाही. तर पाचव्या व्यक्तीचा रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला. त्याचे शवविच्छेदन करण्यात आले असून अहवाल प्राप्त झाला नाही. मात्र, जास्त दारू पिल्याने मृत्यू झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. मृत्यू झालेले पाचही जण दारुच्या आहारी गेले होते. त्यांनी दूषित किंवा बनावट दारू प्यायली होती का? याचाही पोलीस शोध आहेत, असे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले.
दूषित किंवा बनावट दारू प्यायल्याने दरवर्षी भारतात हजारो नागरिकांचा मृत्यू होतो. गावठी दारू तसेच बनावट विदेशी दारु तयार करणाऱ्या अड्ड्यांवर पोलीस कायम छापे मारत असतात.