मल्लापुरम (केरळ) - राज्यातील पहिली तृतीयपंथी उमेदवार मल्लापुरम जिल्ह्यातून विधानसभा निवडणूक लढवणार आहे. मुळच्या वेंगारा येथील असलेल्या अनन्या कुमारी अलेक्स, मलप्पुरम जिल्ह्यातील वेंगारा मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत. अनन्या डेमोक्रॅटिक सोशल जस्टिस पक्षाच्या उमेदवार आहेत. रिटर्निंग ऑफिसरने छाननीनंतर अनन्याचा निवडणूक अर्ज स्वीकारला आहे.
अनन्या इंडियन युनियन ऑफ मुस्लिम लीगचे (आययूएमएल) उमेदवार पी के कुन्हालिकुट्टी आणि डावी लोकशाही आघाडीचे (एलडीएफ) उमेदवार पी जीजी यांच्याविरूद्ध निवडणूक लढवत आहेत. अनन्या अत्यंत महत्वाच्या मतदारसंघात आपले नशीब आजमावत आहे.
हे विजय किंवा पराभवाचे नाही, असे सांगून अनन्या कुमारी म्हणाली की, बाजूला ठेवलेल्या लोकांचे प्रतिनिधित्व करण्याचे आपले लक्ष्य आहे. केरळची पहिली ट्रान्सजेंडर रेडिओ जॉकी असणारी अनन्या मतदानात इतिहास घडवण्याची आशा करतो.
'माझ्या अस्तित्वाच्या जाणिवेचे पुरावे जगासाठी सोडणार'
अनन्या कुमारी म्हणते, की ही लढाई विजयाची किंवा पराभवाची नाही, तर ही लढाई समाजाने बाजूला ठेवलेल्या लोकांचे प्रतिनिधित्व करण्याची आहे आणि तेच आपले लक्ष्य आहे. केरळची पहिली तृतीयपंथी रेडिओ जॉकी असणारी अनन्या मतदानात इतिहास घडवण्याची आशा करत आहे. जगातील एखाद्या कोपऱ्यात जिथे कोणालाही माझ्या अस्तित्वाची जाणीव होणार नाही, असे जीवन जगण्याची माझी इच्छा नाही. मला या जगात माझ्या वास्तव्याचे, माझ्या असण्याचे पुरावे ठेऊन जायचे आहे. त्यामुळे ही निवडणूक जिंकण्याचे माझे प्रयत्न आहे, असे अनन्या सांगते. राजकारणात येण्याचा मुख्य उद्देश लोकांचे प्रतिनिधीत्व करणे हा आहे. मी जिंकून आल्यास माझ्या पदाच्या माध्यमातून मी समाजातील एका वर्गाच्या उन्नतीसाठी, प्रगतीसाठी काम करेल, असे अनन्या म्हणते.
केरळ निवडणूक -
केरळ विधानसभेत 140 जागांसाठी 6 एप्रिल 2021 मतदान होईल. तर निवडणुकीचे निकाल 2 मे 2021 ला लागतील. राज्याची ही 15 वी विधानसभा निवडणूक असणार आहे. 2021 मध्ये 140 जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीत भाजपा पाय रोवण्याचा प्रयत्न करत आहे. सध्या केरळात माकपाच्या नेतृत्वात डावे पक्ष सत्तारुढ आहेत. सत्तेत येण्यासाठी भाजपाकडूनही जोरदार तयारी सुरू आहे. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर केरळमध्ये भारतीय जनता पक्षाने राज्यव्यापी विजययात्रेचे आयोजन केले आहे. केरळमधील डावी आघाडी आणि काँग्रेस या प्रमुख पक्षांपुढे भाजपाने आव्हान उभे केले आहे.
‘मेट्रोमॅन’ नावने प्रसिद्ध पावलेले ई. श्रीधरन यांनी भाजपात प्रवेश केला आहे. देशभरात त्यांची ख्याती आहे. त्यामुळे त्यांचा फायदा भाजपाला होईल, असे दिसते. डाव्या आघाडीविरोधात भाजपा, कोरोना महामारीतील अपयश, ‘लव्ह जिहाद’ आणि शबरीमला हे मुद्दे उपस्थित करू शकते. एकूणच भारतीय जनता पक्षाच्या या विजययात्रेमुळे केरळचे राजकारण ढवळून निघणार आहे.
मागील निवडणूकीतील संख्याबळ -
केरळ विधानसभेत एकूण 140 जागा आहेत. मागील विधानसभा निवडणुकीत एलडीएफने (मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष)91 जागांवर विजय मिळवला होता. यूडीएफने (संयुक्त लोकशाही आघाडी) 47 जागा जिंकण्यात यश मिळवलं होतं. तर भाजपला एका जागेवर समाधान मानावं लागलं होतं. भाजपने एकूण 98 जागांवर आपले उमेदवार उतरवले होते.
हेही वाचा - पाच राज्यांच्या निवडणुकांचा कार्यक्रम, वाचा सविस्तर...