गोपालगंज (बिहार) - राष्ट्रीय जनता दलचा समर्थक आणि व्यावसायाने मच्छीमार असलेल्या व्यक्तीची हत्या झाल्याप्रकरणी राज्याचे समाज कल्याणमंत्री रामसेवक सिंह यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्यासह इतर पाच जणांचाही आरोपी म्हणून समावेश आहे. मृताच्या कुटुंबीयांनी याप्रकरणी तक्रार देऊन न्यायाची मागणी केली आहे.
हथुआ पोलीस स्टेशनअंतर्गत रुपनचक गावातील जयबहादुर सिंह यांची शुक्रवारी मीरगंज भागातील सबेया फिल्डजवळ अज्ञातांनी गोळी मारून हत्या केली होती. शनिवारी मृताचे नातू धीरेंद्र सिंह यांनी मीरगंज पोलीस ठाण्यात समाज कल्याणमंत्री रामसेवक सिंह यांच्यासहीत पाच जणांवर कट रचून हत्या केल्याची तक्रार नोंदवली.
मंत्र्याने मतदानापूर्वी दिली होती धमकी -
पोलीस ठाण्यात दिलेल्या निवेदनानुसार, मंत्री आणि स्थानिक आमदार रामसेवक सिंह हे जयबहादुर सिंह यांच्यावर त्यांच्या पक्षाला मतदान करण्यासाठी दबाव आणत होते. जयबहादुर यांनी त्यांच्या पक्षाला मतदान करण्यास नकार दिला होता. यावर रामसेवक सिंह, श्रीराम सिंह, बलराम सिंह आणि भगवान सिंह यांच्यासह ६ जणांनी धमकी दिली होती. निवडणूक संपल्यानंतर तुला याचे परिणाम भोगावे लागतील, अशी धमकी दिल्याचा उल्लेख निवेदनात आहे.
मंत्र्यांशी संपर्क होऊ शकला नाही -
ईटीव्ही भारतने याप्रकरणी मंत्री रामसेवक सिंह यांची बाजू जाणून घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. तर, यासंदर्भात पोलीस अधीक्षकांनी बोलण्यास नकार दिला.
हेही वाचा - आईची हत्या करून फरार झालेल्या आरोपीला तब्बल 9 वर्षांनी अटक
हेही वाचा - उत्तरप्रदेश तिहेरी हत्याकांड प्रकरणातील आरोपीला फाशीची शिक्षा; 50 हजारांचा दंड