छतरपूर (मध्य प्रदेश) : गेल्या अनेक दिवसांपासून पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री विविध प्रकरणांमुळे देशभरात चर्चेत आहेत. नुकतेच त्यांनी हिंदू राष्ट्राची मागणी करत छतरपूरच्या गाडा गावात हिंदू राष्ट्राच्या पूर्ततेसाठी मोठा यज्ञ केला. यामध्ये राज्यासह देश विदेशातील अनेक दिग्गज नेते उपस्थित होते. मात्र आता दुसरीकडे पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांचे धाकटे बंधू शालिग्राम याचा एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. व्हिडिओत तो पिस्तूल आणि सिगारेट घेऊन गावातील लोकांशी भांडताना दिसत आहे.
काय आहे प्रकरण? : मिळालेल्या माहितीनुसार, 11 फेब्रुवारीला आटकोन्हा गावातून आकाश अहिरवार यांच्या लग्नाची मिरवणूक गाडा गावात राहणाऱ्या सीता अहिरवार यांच्या घरी गेली. मिरवणुकीतील काही वराती जेवण करत होते तर काही वराती डीजे आणि राई (लोकनृत्य) वर नाचत होते. तेवढ्यात धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांचा भाऊ शालिग्राम चार ते पाच जणांसह हातात पिस्तूल घेऊन आला आणि त्याने अचानक लग्नात उपस्थित असलेल्या लोकांना मारहाण करण्यास सुरुवात केली. त्याने वरातींना जातीवाचक शिवीगाळ करत मंडपात तोडफोड केली.
दारूच्या नशेत होता : लग्नाच्या मिरवणुकीत पोहोचलेले वराती हरप्रसाद अहिरवार सांगतात की, आम्ही जेवायला निघालो होतो, तेवढ्यात धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांचा धाकटा भाऊ शालिग्राम त्याच्या काही सहकाऱ्यांसह आला. तो दारूच्या नशेत होता. त्याच्या तोंडात सिगारेट होती. लग्नात डीजे आणि राई वाजवण्याची तुमची हिंमत कशी झाली, असे म्हणत त्याने मारहाण सुरु केली. ते पुढे म्हणतात की, काही लोक त्याला अडवण्याचा प्रयत्न करत होते, मात्र लोक त्याच्या जवळ गेल्यावर त्याने त्यांना मारहाण करण्यास सुरुवात केली.
धीरेंद्रकृष्ण शास्त्रींनी कुटुंबीयांना बोलावले : वरातींनी सांगितले की, या गोंधळानंतर धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांचे काही सेवक तेथे आले आणि ते मुलीचे वडील, भाऊ आणि वर यांना तेथून घेऊन नेले. त्यानंतर काय झाले हे कोणालाही माहिती नाही. या प्रकरणाने कुटुंब घाबरले आहे. ईटीव्ही भारतने जेव्हा वराशी बोलण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्याने, मला याविषयी काही बोलायचे नाही, असे उत्तर दिले. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल होताच पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री आणि त्यांच्या भावावर अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.
हेही वाचा : Chhattisgarh Naxal Attack : छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांचा भ्याड हल्ला, महाराष्ट्र सीमेवर दोन जवान शहीद