गोड्डा - आई-वडील आपल्या मुलांसाठी काय काय करतील त्याची कल्पनाही करता येणार नाही. प्रश्न जर मुलाच्या जीवाचा असेल तर स्वत:च्या जीवाची बाजी लावताना देखील ते मागेपुढे पाहत नाहीत. अशीच एक घटना झारखंडच्या गोड्डा याठिकाणी घडली आहे. थॅलेसेमिया आजार असलेल्या पाच वर्षाच्या मुलाला निगेटिव्ह रक्त चढवण्यासाठी वडिलांनी 350 किलोमीटरचा प्रवास सायकलवरून केला आहे.
गोड्डा जिल्ह्यातील मेहरमा विभागात राहणाऱ्या दिलीप यादव यांनी त्यांच्या पाच वर्षीय मुलाला रक्त चढवण्यासाठी सायकलवरून जामताडा गाठलं. साधारण 350 किलोमीटरचा प्रवास त्यांनी सायकलवरुन केला. दिलीप यादव हे एक मजूर असून त्यांचा मुलगा विवेक यास थॅलेसेमिया आजार आहे. लॉकडाऊनपूर्वी दिलीप आपल्या मुलासह दिल्लीत राहत होते. मात्र, लॉकडाऊनमुळे ते गावी परतले. गावी आल्यानंतर गोड्डा जिल्ह्यात त्यांना मुलासाठी निगेटिव्ह रक्त मिळवण्यात अडचणी निर्माण झाल्या.
जामताडामध्ये ए निगेटिव्ह रक्त उपलब्ध असल्याची माहिती त्यांना मिळाली. मुलाला ए निगेटिव्ह रक्त चढवण्यासाठी त्यांनी मुलाला घेऊन सायकलवरून जामताडा गाठलं. लॉकडाऊदरम्यान त्यांनी दोनदा सायकलवरून गोड्डा ते जामताडा असा प्रवास केला आहे. याप्रकरणी मदत मिळावी म्हणून दिलीप यादव यांनी स्थानिक आमदार दीपिका पांडेय सिंह यांचीही भेट घेतली होती. मुख्यमंत्री हेमंत यांनीही प्रशासनाला याप्रकरणी लक्ष घालण्याचे निर्देश दिले आहेत.
थॅलेसेमिया काय असतो?
थॅलेसेमिया हा मुख्यत्वे बालकांमध्ये आढळणारा, आनुवांशिकतेने होणारा जनुकीय आजार आहे. यामध्ये रुग्णाच्या रक्तातील हिमोग्लोबिन खूपच कमी असते आणि तांबडय़ा रक्तपेशींची संख्याही सर्वसाधारण कमी राहते. भारतात दरवर्षी या आजाराने पीडित असलेली १० ते १२ हजार बालके जन्माला येतात. या रोगात शरीरात रक्त निर्माण होणाच्या प्रक्रियेत अडथळा येतो. शरीरात हिमोग्लोबीन नसल्याने शरीराला गरजेइतकाही प्राणवायू न मिळाल्याने रुग्णाच्या मृत्यूचा धोका संभवतो.