वैशाली (बिहार) : बिहारच्या वैशाली येथील रहिवासी शहीद जय किशोर सिंह यांचे वडील राजकुमार सिंह यांना पोलिसांनी अटक केली. हे प्रकरण शहीद मुलाच्या मूर्तीच्या स्थापनेच्या वादाशी संबंधित आहे. मूर्ती बनवण्याची जागा सरकारी जमिनीवर होती. या प्रकरणी पोलिसांनी सांगितले की, जिल्हाधिकाऱ्यांनी विचारल्यावर खरी परिस्थिती कळली. त्या पार्श्वभूमीवर ही अटक करण्यात आली आहे.
शहीदाच्या वडिलांना पोलिसांनी पकडले : शहीद मुलाच्या आईने आरोप केला आहे की, जंदाहा पोलीस ठाण्याचे प्रमुख रात्री आले आणि पतीला लाथा मारत आणि शिवीगाळ करत घेऊन गेले. पोलिसांच्या या अशा कारभारावर आता प्रश्न उपस्थित केले जात आहेत. ज्या बापाने देशासाठी आपल्या तरुण मुलाचे बलिदान दिले त्या बापाला अशी वागणूक मिळताना पाहून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. आता या प्रकरणी पोलिस सारवासारव करण्याचा प्रयत्न करत आहेत.
'सरकरी जमीन आहे हे माहित नव्हते' : शहीद जय किशोर यांच्या आई मंजू देवी म्हणाल्या की, 'पोलिसांनी रात्री 11 वाजता त्यांना लाथा मारत आणि शिवीगाळ करत हाजीपूर कारागृहात नेले. दानापूरहून लष्करी जवान आले होते. त्यांच्याशी देखील बोलणे झाले आहे. माझा मोठा मुलगाही सैन्यात शिपाई आहे. त्याच्याशीही चर्चा झाली. ही जमीन सरकारी आहे हे त्यांना पकडून नेल्यानंतर कळाले. आधी चौकशी केली असती तर तेव्हाच कळले असते'.
लष्करी अधिकाऱ्यांची पोलिसांशी चर्चा : दानापूर येथील लष्कराच्या 12 व्या बटालियन बिहार रेजिमेंटचे सुभेदार विनोद कुमार सिंग यांना याची खबर मिळताच ते या प्रकरणाचा जाब विचारण्यासाठी जांदहा दरोगा विश्वनाथ राम यांच्याकडे गेले. लष्कराच्या अधिकाऱ्याने जंदाहा पोलीस ठाण्याच्या प्रमुखांशी तासभर चर्चा केली. जमिनीच्या वादात पोलिसांनी शहीद जवानाच्या वडिलांना ज्या पद्धतीने अटक केली त्यामुळे पोलिसांच्या प्रती नाराजी आहे.
'आम्ही कोणाचाही अपमान केलेला नाही' : जंदाहा पोलिस ठाण्याचे ठाणेदार विश्वनाथ म्हणाले की, 'शहीद जवान आणि त्यांच्या पुतळ्याच्या संदर्भात मी जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांकडून माहिती घेतली. मी त्यांना वाद का चालू आहे हे सांगितले. याच वादातून ही अटक झाली आहे. त्यांचे कुटुंबीय स्वतः त्यांचा अपमान करत आहेत. मी त्यांचा अपमान करत नाही. सध्या सुरू असलेल्या प्रक्रियेनुसारच आम्ही काम करत आहोत. आम्ही कोणाचाही अपमान केलेला नाही.'
रात्री उशिरा अटक का केली? : प्रश्न हा आहे की, जर पोलिसांची कार्यशैली न्यायप्रविष्ट होती, तर शहीदांच्या घरात रात्री उशिरा घुसून छापा टाकण्याची काय गरज होती? अशी परिस्थिती का निर्माण झाली? जिथे पोलीस इतर गुन्हेगारांना पकडण्यात सुस्त दिसतात, त्याचवेळी शहीद जवानाच्या वडिलांना पकडण्यात पोलिसांनी एवढी चपळता का दाखवली?, असा सवाल जंधा पोलिसांना विचारला जात आहे. या घटनेमुळे वैशाली पोलिसांचीही चांगलीच दमछाक होत आहे. सध्या या संपूर्ण प्रकरणात वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी उत्तर देणे बाकी आहे.
हेही वाचा : JK Police : काश्मिरी पंडित संजय शर्मा यांची गोळ्या झाडून हत्या करणाऱ्या दोन दहशतवाद्यांना केले ठार