नवी दिल्ली - कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांचे गेल्या दोन महिन्यापासून आंदोलन सुरू आहे. केंद्र सरकारसोबत चर्चेच्या फेऱ्या पार पडल्यानंतर कोणताही तोडगा अद्याप निघालेला नाही. त्यामुळे येत्या 26 जानेवारीला शेतकरी ट्रॅक्टर रॅली काढणार आहेत. शेतकऱयांच्या ट्रॅक्टर रॅलीला पोलिसांनी मान्यता दिल्याचे स्वराज इंडियाचे योगेंद्र यादव यांनी सांगितले.
शनिवारी शेतकरी नेते व पोलीस यांच्यात बैठक झाली. या बैठकीनंतर स्वराज इंडियाचे योगेंद्र यादव यांनी पत्रकारांशी संवाद साधला. शेतकरी दिल्लीत शांततेत मोर्चा काढतील. तसेच उद्या परेडचा मार्ग अंतिम होईल, असे यादव यांनी सांगितले.
26 जानेवारीला ऐतिहासिक परेड होईल. पोलिसांना बॅरिकेड तोडण्याचा इशारा दिला होता. पण पोलिसांनीच ते काढण्यास स्वतः मान्य केले आहे. हा शेतकऱ्याचा विजय आहे. संपूर्ण जग दिल्लीत शेतकरी परेड पाहील, असेही ते म्हणाले. परेडची वेळ अद्याप अंतिम नाही. परेड 24 तास ते 72 तास चालविली जाईल, असे यादव म्हणाले. तसेच या काळात शांतता राखण्याचे आवाहन त्यांनी केले.
शेतकऱ्यांची भूमिका -
दोन वर्ष कायदे स्थगीत करण्याचा प्रस्ताव शेतकरी संघटनांनी नाकारला आहे. कृषी कायदे मागे घ्यावे, ही मागणी शेतकरी संघटनांनी केली आहे. जोपर्यंत कायदे रद्द होत नाहीत. तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही, अशी भूमिका शेतकरी संघटनांनी घेतली आहे. शेतकरी आंदोलन शांततेत सुरुच राहणार असल्याचेही शेतकरी नेत्यांनी सांगितले.