गाझियाबाद - शेतकर्यांच्या ट्रॅक्टरला पेट्रोल पंपावर डिझेल दिले नाही. तर पेट्रोल पंप बाहेर ट्रॅक्टर जाम केला जाईल, असा इशारा शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी दिला आहे. उत्तर प्रदेशमधील काही जिल्ह्यांमध्ये पेट्रोल पंपांवर ट्रॅक्टरना डिझेल नाकारला जात असल्याचा आरोप राकेश टिकैत यांनी केला.
ट्रॅक्टरला इंधन दिले जाणार नाही, असे पोस्टर पेट्रोल पंपावर लावले जात आहेत. यातून हे स्पष्ट झाले आहे की, शेतकऱ्यांना दिल्लीत जाण्यापासून रोखण्याचा कट आहे. शेतकरी हे षडयंत्र यशस्वी होऊ देणार नाहीत, असे टिकैत म्हणाले. तसेच आंदोलन सुरू असलेल्या ठिकाणी म्हणेजच दिल्ली आणि गाझियाबाद सीमेवर पेट्रोल पंप आहेत. येथील पेट्रोल पंपावर अशा प्रकारचे पोस्टर लावण्यात आलेले नाहीत. येथून पेट्रोल भरण्यात येत आहे, असे टिकैत यांनी सांगितले.
संयुक्त कृषी मोर्चाच्या वतीने येणाऱ्या प्रजासत्ताक दिनी (दि. 26 जाने.) दिल्लीत ट्रॅक्टर रॅली काढण्यात येणार आहे. शेतकऱयांच्या ट्रॅक्टर रॅलीला पोलिसांनी मान्यता दिली आहे. रॅलीनंतर लगेचच आंदोलक शेतकरी पुन्हा सीमांवर परततील तसेच रॅलीमध्ये कोणतीही अप्रिय घटना होणार नाही, याची काळजी घेण्यात येईल, असे शेतकरी नेत्याने सांगितले.
पुरुषांबरोबर महिलादेखील परेडमध्ये सहभागी -
जवळपास दोन महिन्यांपासून शेतकरी कृषी कायद्याविरूद्ध दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करत आहेत. सरकार आणि शेतकरी यांच्यात आतापर्यंत 11 फेऱ्या झाल्या आहेत. परंतु अद्याप तोडगा निघालेला नाही. सरकार किंवा शेतकरी दोघेही माघार घेण्याच्या मनस्थितीत नाहीत. पंजाबमधील खेड्या-पाड्यातून लोक ट्रक्टर रॅलीमध्ये सहभागी होण्यासाठी येत आहेत. पुरुषांबरोबर महिलादेखील या परेडमध्ये सहभागी होणार आहेत.