चंदीगढ - दिवंगत हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेच्या नावाने पंजाबमध्ये बनावट पक्ष चालवण्यात येत असल्याचे समोर आले आहे. शिवसेनेच्या नावावर बनावट पक्ष निर्माण करणाऱ्याविरोधात कारवाई करण्यात येणार आहे. जालंधरच्या प्रेस क्लबमध्ये शिवसेनेच्यावतीने पत्रकार परिषद घेण्यात आली. यामध्ये पंजाब दौर्यावर असलेले शिवसेना राष्ट्रीय संघटक अशोक तिवारी उपस्थित होते. पोलीस स्थानकात तक्रार देण्यात येणार असून बनावट शिवसेना बंद करण्यात येईल, असे अशोक तिवारी यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. तसेच शेतकरी आंदोलनाला त्यांनी पाठिंबा दर्शवला. केंद्राने कृषी कायदे रद्द करावे, अशी मागणी त्यांनी केली.
शिवसेना बंद करण्याचे धोरण आखले जात आहे. शिवसेना पंजाबमध्ये निवडणुका लढवेल पण कोणत्याही किंमतीत भाजपाशी सहयोग करणार नाही. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचा निर्णय अंतिम असेल. शिवसेना मैदानात उतरली असून पंजाबमधील शिवसेनेची एकूण परिस्थिती अशोक तिवारी यांनी सांगितली.
शिवसेना हा एकमेव पक्ष आहे. जो पंजाबमधील हिंदूंसाठी कार्य करीत आहे, असे पंजाबचे अध्यक्ष हरीश सिग्ला म्हणाले. यावेळी रमण वाकडेरा, कपिल वर्मा, आशिष अरोरा, दिनेश कपूर, कला बाबा, रोहित जोशी, राजू ठाकूर, वरदार कुमार, दीपक शर्मा, मनदीप सिंग, प्रिन्स बाघा, राजेंद्र शर्मा, मिकू चौधरी, अनुराग वर्मा यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते.
पंजाब विधानसभा निवडणूक शिवसेना लढवणार?
पंजाबमध्ये 2022 ला होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्ष नेतृत्वाच्या सूचनेनुसार राज्यस्तरीय नेते व कार्यकर्त्यांशी चर्चा करण्यासाठी अशोक तिवारी पंजाबमध्ये आले आहेत.सात दिवस पंजाबमध्ये मुक्काम केल्यानंतर तयार केलेला अहवाल पक्षाचे सुप्रीमो आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे सोपवण्यात येईल, असे शिवसेना राष्ट्रीय संघटक अशोक तिवारी यांनी सांगितले आहे. शिवसेनेच्या वतीने पंजाब विधानसभा निवडणूक लढविण्यावर त्यांनी भाष्य केले. एकट्याने निवडणूक लढवायची की दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारसरणीशी सहमत असलेल्या राजकीय पक्षांसोबत निवडणूक लढवायची याचा निर्णय शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे घेतील, असे अशोक तिवारी यांनी सांगितले.