नवी दिल्ली - संसदेचे पावसाळी अधिवेशन 19 जुलैला सुरू झाले होते. तर ते 13 ऑगस्ट रोजी संपणार होते. मात्र, बुधवारी सभापती ओम बिर्ला यांनी लोकसभेचे कामकाज मुदतीआधीच अनिश्चित काळासाठी तहकूब केले. पेगासस हेरगिरी घोटाळा, कृषी कायदा, बेरोजगारी, महागाई या मुद्द्यावरून विरोधकांनी घातलेल्या गोंधळामुळे सभागृहाची कामगिरी अपेक्षेप्रमाणे पार पडली नसल्याचे सभापती ओम बिर्ला म्हणाले. अधिवेशनाच्या 96 तासांपैकी 74 तास कोणतेही काम झाले नाही. गेल्या 16 दिवसांमध्ये 21 तास काम झाल्याचे त्यांनी सांगितले.
लोकसभेत केवळ 22 टक्के काम झाले. अधिवेशनादरम्यान काही महत्त्वाचे आर्थिक आणि वैधानिक कामकाज झाले. यात महत्त्वाचे म्हणजे 127 वे घटना दुरुस्ती विधेयकही मंजूर झाल्याचे त्यांनी सांगितले. या अधिवेशनात अनेक विधेयके सादर करण्यात आली. संविधानाच्या 127 व्या सुधारणा विधेयकासह एकूण 20 विधेयके मंजूर करण्यात आल्याची माहिती बिर्ला यांनी दिली.
राज्यसभा अध्यक्षांच्या खुर्चीवर फाईल फेकणे लाजिरवाणे असल्याची टिका भाजपा नेते अनुराग ठाकूर यांनी केली. जो पक्ष दोन वर्षांपर्यंत आपला अध्यक्ष निवडू शकत नाही. देशातील लोकांनी ज्यांना संसदेत आपल्य समस्या मांडण्यासाठी पाठवले आहे. ते संसदेत फायली फेकतात. गोंधळ निर्माण करतात. राज्यसभेत विरोधकांनी टेबलवर चढून फाइल राज्यसभा अध्यक्षांच्या खुर्चीवर फेकली, हे लज्जास्पद आहे, असे अनुराग ठाकूर म्हणाले.
संपूर्ण अधिवेशनादरम्यान विरोधकांनी गोंधळ घातल्याने कामकाज सुरळीत चालले नसल्याचे सत्ताधारी नेत्यांनी म्हटलं. संसदेत गदारोळ घालणाऱ्या सदस्याविरोधात कडक कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती आहे. राज्यसभेत गोंधळ निर्माण करणाऱ्या खासदारांची तक्रार संसदेच्या आचार समितीकडे पाठवली जाऊ शकते. सरकारला राज्यसभेत गोंधळ निर्माण करणाऱ्या खासदारांवर कठोर कारवाई करण्याची इच्छा आहे. कोरोना महामारीत संसदेचे हे दुसरे मान्सून अधिवेशन होते. सामान्यत: संसदेचे मान्सून अधिवेशन हे जुलैच्या तिसऱ्या आठवड्यात सुरू होते. तर स्वातंत्र्यदिनापूर्वी संसदेचे मान्सून अधिवेशन संपते.