इंफाळ : मणिपूरमध्ये 3 मेपासून सुरू झालेला हिंसाचार 50 दिवस पूर्ण झाल्यानंतरही सुरुच आहे. मणिपूरमध्ये आज अज्ञात बंदूकधारी आणि आसाम रायफल्समध्ये गोळीबार झाला आहे. गुरुवारी पहाटे 5 वाजता मणिपूरच्या इंफाळ पश्चिम जिल्ह्यातील उत्तर बोलझांग येथे अज्ञात उग्रवादी आणि आसाम रायफल्सच्या जवानांमध्ये गोळीबार झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. परिस्थिती नियंत्रणात आली असून उग्रवाद्यांना पकडण्यासाठी शोधमोहीम सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे.
हरोथेलच्या दोन दिशांनी बेछूट गोळीबार : बुधवारी संध्याकाळी 5.45 च्या सुमारास इम्फाळ पूर्व जिल्ह्यातील YKPI च्या उत्तरेकडील उरंगपतजवळ गोळीबाराचे आवाजही ऐकू आले. 5.30 च्या सुमारास अज्ञात बंदूकधाऱ्यांनी हरोथेलच्या दोन दिशांनी बेछूट गोळीबार केल्याचेही वृत्त आहे. सायंकाळी साडेसातच्या सुमारास परिस्थिती नियंत्रणात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. बुधवारी महिला कार्यकर्त्यांनी सावोनबुंग-वायकेपीआय रस्ता अनेक ठिकाणी रोखल्याचेही सूत्रांनी सांगितले.
मुख्यमंत्री बिस्वा सरमा यांच्यावर गंभीर आरोप : काँग्रेस पक्षाने आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. सरमा यांचे कुकी दहशतवाद्यांशी संबंध असल्याचा काँग्रेस पक्षाचा आरोप आहे. मात्र मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी हे आरोप निराधार असल्याचे स्पष्ट केले आहे. आसामच्या प्रदेश महिला काँग्रेसच्या अध्यक्षा मीरा बोरठाकूर गोस्वामी यांनी सरमा यांच्यावर हे आरोप केले आहेत. 2017 मध्ये मणिपूर विधानसभा निवडणुकीत सरमा यांनी कुकी अतिरेक्यांची मदत घेतली होती, असा आरोप बोरठाकूर यांनी केला आहे.
मणिपूरमध्ये 3 मे पासून हिंसाचार सुरू : मणिपूरमध्ये 3 मेपासून हिंसाचार सुरू आहे. या हिंसाचारात आतापर्यंत 110 जणांचा मृत्यू झाला आहे. 50 हजारांहून अधिक नागरिकांना छावण्यांमध्ये राहण्यास भाग पाडले आहे. नागा आणि कुकी समाजातील परस्पर विश्वासाची दरी कमी होण्याऐवजी रुंदावत आहे. अशा परिस्थितीत आता अनेकांनी राष्ट्रपती राजवटीची मागणीही सुरू केली आहे. मात्र, असे करणे भाजप सरकारसाठी 'आत्मघाती' ठरेल, कारण राज्यात भाजपचेच सरकार आहे.
हेही वाचा -