पणजी: गोव्यातील मुरगाव तालुक्यात हा मुरगाव मतदारसंघ येतो. येथील मतदारांची संख्या २९ हजार इतकी आहे. यामध्ये १४ हजार पुरुष तर १५ हजार महिला मतदार आहेत.आमदार मिलिंद नाईक हे रिंगणात आहेत त्यांना पारंपरिक प्रतिस्पर्धी काँग्रेसचे उमेदवार संकल्प आमोणकर यांनी आव्हान दिले आहे. नाईक हॅट्रिक साधतात की आमोणकर त्यांना चितपट करतात याबाबत उत्सुकता ताणली गेली आहे. या मतदारसंघातून तृणमूल काँग्रेसचे जयेश शेटगावकर आणि आपचे परशुराम सोनुर्लेकर निवडणूक लढवत आहेत. एकूण आठ उमेदवार निवडणूकीच्या रिंगणात असलेल्या या मतदारसंघांत यंदा कोण निवडणूक जिंकणार हे पाहणे औत्सूक्याचे ठरणार आहे.
मिलिंद नाईक हे मुरगाव मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणारे गोवा विधानसभेचे सदस्य आहेत. गोव्यातील लक्ष्मीकांत पार्सेकर यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये ते मंत्री होते. त्यांच्याकडे शहरी विकास, समाजकल्याण आणि प्रोवेडोरिया खात्यांची जबाबदारी होती. मिलिंद नाईक जुलै 2020 मध्ये लॉकडाऊनच्या बाजूने नव्हते, तर मुरगाव नगर परिषद, स्थानिक व्यवसाय, बाजार समित्या तसेच इतर भाजप आमदारांनी ऐच्छिक लॉकडाऊनचे आवाहन केले होते.
मिलिंद नाईक यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. त्यांच्यावर सेक्स कॅण्डलमध्ये गुंतल्याचा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी केला होता. संकल्प आमोणकर यांनी या बाबत पोलिसात तक्रार दाखल केल्यावर नाईक यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. बिहारमधील एका महिलेचे लैंगिक शोषण करण्यात आल्याचा गंभीर आरोपाचे ऑडिओ आणि व्हिडिओ पुरावेही असल्याचा दावा चोडणेकर यांनी केला. या प्रकरणाची दखल घेत त्यांना यांना पदावरून हटवण्यात आले होते.