आज 'या' घडामोडींवर असणार नजर -
- केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची थांबलेली जन आशीर्वाद यात्रा आज सिंधुदुर्गात दाखल होणार आहे. त्यांच्या अटकेमुळे ही यात्रा एका दिवसासाठी स्थगित करण्यात आली होती.
- आज राज्य मंत्रीमंडळाची विशेष बैठक पार पडणार आहे.
- कुटुंबाला भेटण्यासह सचिन वाझेंच्या तीन मागण्यावर NIA च्या विशेष न्यायलयात आज सुनावणी होणार आहे.
- आजपासून महाराष्ट्रात 2 सप्टेंबरपर्यंत सर्वदूर पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. यात विदर्भात अलर्ट देण्यात आला आहे.
- ठाणे जिल्हा आरोग्य विभाग आणि शिक्षण विभागाच्या समन्वयाने सर्व शासकीय कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण केद्रांवर ठाणे जिल्हातील सर्व शासकीय आणि खासगी शाळांमधील शिक्षक तसेच शिक्षकेतर कर्मचारी यांचे आज प्राधान्याने लसीकरण करण्यात येणार आहे.
- अकरावी प्रवेशासाठी पहिली कट ऑफ लिस्ट आज जाहीर होणार आहे.
- प्रसिद्ध सिनेअभिनेत्री नेहा धुपिया हिचा आज वाढदिवस.
कालच्या महत्वाच्या बातम्या -
काबूल (अफगाणिस्तान) - काबूल आंतरराष्ट्रीय विमानतळाबाहेर गुरुवारी दुहेरी आत्मघातकी बॉम्बस्फोट झाले, जिथे अफगाणिस्तानातून पळून जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या लोकांच्या मोठ्या संख्येने जमाव जमा झाला होता यावेळी येथे आत्मघातकी बॉम्बस्फोब हल्ला झाला आणि यात कमीतकमी 60 अफगाणी आणि 12 अमेरिकन सैनिक मारले गेल्याची माहिती अफगाण आणि अमेरिकन अधिकाऱ्यांनी दिली आहे. तर हा हल्ला ISIS-K या दहशतवादी संघटनेनी केल्याचे मान्य केले आहे.सविस्तर वाचा...
मुंबई - राज्यपाल नामनिर्देशित 12 सदस्यांच्या नेमणुकीबाबत पुन्हा एकदा महाविकास आघाडी सक्रिय झाली आहे. मुख्यमंत्र्यांचे स्वीय सहाय्यक मिलिंद नार्वेकर यांनी राजभवनात जाऊन भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. राज्यपाल नामनिर्देशित 12 सदस्यांच्या नेमणुकीबाबत नार्वेकर यांनी राज्यपालांकडे वेळ मागितला. राज्यपालांनी महाविकास आघाडी सरकारच्या नेत्यांना भेटीसाठी एक सप्टेंबरची वेळ दिली आहे.सविस्तर वाचा...
औरंगाबाद - अफगाणिस्तानमध्ये असलेल्या परिस्थितीनंतर आता जिल्ह्यात हाय अलर्ट जारी करण्यात आले आहेत. अफगाणिस्तान येथून येणाऱ्या नागरिकांमुळे पोलिओ सक्रिय होण्याची भीती असल्याने हा अलर्ट देण्यात आला असून येणाऱ्या नागरिकांची माहिती देण्याचा सूचना पालिकेने दिल्या आहेत.सविस्तर वाचा...
म्हैसूर - प्रियकरासोबत पर्यटनासाठी गेलेल्या एका विद्यार्थिनीवर सामूहिक बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पीडिता ही मुळची मुंबईची रहिवासी आहे. कर्नाटकातील बंगळुरुपासून सुमारे 150 किलोमीटरवर असलेल्या म्हैसूरमध्ये हा प्रकार घडला. विद्यार्थिनी तिच्या प्रियकरासोबत शहरातील चामुंडी टेकडीवर गेली असताना आरोपींनी तिच्यावर बलात्कार केला. या प्रकरणी आरोपींविरोधात लैंगिक छळाच्या आरोपावरून अलानहल्ली पोलीस ठाण्यामध्ये एफआयआर दाखल करण्यात आला आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. या प्रकरणी कर्नाटकाचे गृहमंत्र्यांनी वादग्रस्त प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, 'ती संध्याकाळी सात वाजता तिथे काय करत होती?'सविस्तर वाचा...
कोल्हापूर - सध्या सर्वांचाच इंजिनिअरिंगकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला आहे. वाढलेल्या बेरोजगार इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांवर दररोजच सोशल मीडियावर अनेक खिल्ली उडवणारे मिम तसेच पोस्ट पाहायला मिळत असतात. मात्र, कोल्हापुरातल्या एका सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थिनीने अशा सर्वच खिल्ली उडवणाऱ्यांचे तोंड बंद केले आहे. कारण नुकतेच तिला एका जगप्रसिद्ध कंपनीने 4, 5 नाही तर तब्बल 41 लाखांचे पॅकेज देऊन सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट इंजिनिअर म्हणून तिची निवड केली आहे. कोण आहे ही विद्यार्थिनी आणि तिच्या या यशाबाबत आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी शेखर पाटील यांनी...सविस्तर वाचा...
वर्धा - हिंगणघाट शहरात दत्त मंदिर परिसरात भांडण सुरू असतांना भांडण सोडवायला गेलेल्या व्यक्तीला जबर मारहाण करण्यात आली आहे. या व्यक्तीला फावडा आणि दगडाने मारुन जखमी करण्यात आले आहे. भांडण सोडवायला जाणे संबंधित व्यक्तीला महागात पडले. दिलीप दानव असे जखमी व्यक्तीचे नाव आहे.सविस्तर वाचा...
पुणे - उधळलेल्या म्हशीने धडक दिल्याने दुचाकीवरून जाणारे पती पत्नी जखमी झाले आहेत. लष्कर पोलीस स्टेशनच्या हद्दीत 8 ऑगस्ट रोजी हा अपघात झाला असून, म्हशीचे मालक आणि जखमी व्यक्तींची नुकसान भरपाई देण्यावरून बोलणी सुरू होती. परंतु ही बोलणी फिसकटल्याने जुबेर अस्लम शेख (वय 38, रा. निलकंठ विहार) यांनी लष्कर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार शहनबाज अब्दुल रजाक कुरेशी, सदाकत कुरेशी आणी नदाफत कुरेशी यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. हे तिघेही म्हशींचे मालक आहेत.सविस्तर वाचा...
नागपूर - मित्रांसोबत दारू पीत असताना झालेल्या किरकोळ वादातून तीन मित्रांनी संगनमत करून एका मित्राची हत्या केल्याची घटना राजीवनगर येथील जुन्या जिल्हा परिषद शाळेच्या आवारात घडली आहे. सुरेंद्र आनंद पीलघर (२६) असे मृतकाचे नाव आहे. घटनेची माहिती समजताच एमआयडीसी हिंगणा पोलिसांनी अवघ्या काही तासांत तीनही आरोपींना अटक केली आहे.सविस्तर वाचा...
जालना - बीडच्या खासदार प्रीतम मुंडे यांनी (आज बुधवारी, दि. 26)रोजी माजी राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांना राखी बांधून औक्षण केले. 'भाऊ'ना सुख-समृद्धी, निरोगी आयुष्य आणि सुयश यावेळी प्रितम यांनी चिंतिले आहे. पंकजा मुंडे यांच्या लहान भगिनी असलेल्या प्रीतम दर्शना बंगल्यावर येऊन अर्जुनराव खोतकर यांना राखी बांधली. खोतकर आणि मुंडे कुटुंबातील ऋणानुबंधास यावेळी उजाळा मिळाला. ज्येष्ठ भाजप नेते स्व. गोपीनाथ मुंडे यांच्या आठवणीने अर्जुन खोतकर यांना यावेळी गहिवरून आले. ताई, मी सदैव आपल्या पाठीशी राहील, अशी ग्वाही खोतकर यांनी यावेळी प्रितम यांना दिली आहे. तर, एक बहीण म्हणून मी कधीच खोतकर परिवाराला अंतर देणार नाही, अशी भावना प्रीतम मुंडे यांनी यावेळी व्यक्त केली आहे.सविस्तर वाचा...
जाणून घ्या तुमचे आजचे राशीभविष्य -
27 ऑगस्ट राशीभविष्य : 'या' राशीवाल्यांना आज प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल; जाणून घ्या आजचे राशीभविष्य