नवी दिल्ली - अमेरिकेचे सैन्य अफागाणिस्तानातून माघारी घेण्यात येत असल्याने अफगाणिस्तानात पुन्हा तालिबाननं डोकं वर काढलं आहे. अफगाणिस्तानातील झपाट्याने बदलणाऱ्या परिस्थितीवर बोलावलेल्या महत्त्वपूर्ण बैठकीसाठी रशियाने भारताला आमंत्रित केलेले नाही. या बैठकीला पाकिस्तान, चीन आणि अमेरिका उपस्थित राहण्याची शक्यता आहे.
अफगाणिस्तानमध्ये तालिबानचे हल्ले वाढत असताना, रशियाने अफगाण शांतता प्रक्रियेवर जोर देणाऱ्या आणि शांतता प्रस्थापित करण्याच्या प्रयत्नात असलेल्या देशाच्या प्रमुखांना आमंत्रित केले आहे. 'विस्तारित ट्रोइका बैठक' 11 ऑगस्ट रोजी कतारमध्ये होणार आहे. यासाठी 18 मार्च आणि 30 एप्रिल रोजी चर्चा झाली होती. रशियाकडून अफगाणिस्तानसाठी ‘मॉक्सो फॉर्मेट’ तयार करण्यात आला आहे.
गेल्या महिन्यात रशियाचे परराष्ट्रमंत्री सर्गेइ लावरोव यांनी ताश्कंदमध्ये म्हटले होते, की रशिया, भारत हे अफगाणिस्तानच्या परिस्थितीवर परिणाम करू शकणाऱ्या इतर देशांबरोबर काम करतील. भारताचे अफगाणिस्तानमधील राजदूत फरीद मामुन्दजे यांनी अफगाणिस्तानमधील परिस्थितीवर चर्चा करण्यासाठी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेची बैठक 6 ऑगस्ट रोजी घेण्याचा निर्णय सकारात्मक पाऊल असल्याचे म्हटले आहे. भारताच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे. या बैठकीत अफगाणिस्तानमधील स्थितीवर चर्चा केली जाणार आहे.
भारत हा अफगाणिस्तानात शांतता आणि स्थिरता स्थापित करणाऱ्या देशांमध्ये प्रमुख पक्षकार आहे. भारताने मदत आणि पुनर्बांधणी उपक्रमांमध्ये जवळपास 3 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक केली आहे. भारताने नेहमीच अफगाणिस्तानच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय शांतता आणि सलोखा प्रक्रियेला पाठिंबा दिला आहे. गेल्या दोन दशकात भारतानं अफगाणिस्तानात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली आहे.
अमेरिकेचे सैन्य माघारी -
मागील काही दशकांपासून अफगाणिस्तान सरकार आणि तालिबानमध्ये संघर्ष सुरू आहे. यात हजारो नागरिकांचा मृत्यू झाला आहे. गेल्या फेब्रुवारी महिन्यात अमेरिकेच्या सहकार्याने तालिबान अफगाणिस्तान सरकारमध्ये शांतता करारावर सह्या करण्यात आल्या. त्यानुसार अमेरिकेचे सैन्य अफागाणिस्तानातून माघारी घेण्यात येत आहेत. 2001 पासून अफगाणिस्तानात तालिबानबरोबरच्या लढ्यात अमेरिकेने 2 हजार 450 जवान गमावले आहेत. अफगाणिस्तानातून आपले सैन्य सप्टेंबरपर्यंत पूर्णपणे मागे घेण्याचा निर्णय अमेरिकेने घेतला आहे. अमेरिकेने पाकिस्तान, रशिया, चीन, भारत आणि तुर्की यांना अफगाणिस्तानात शांतता प्रस्थापित करण्यासाठी मदत करण्याचे आवाहन केले.
हेही वाचा - तालिबान-अफगाण शांतता चर्चेस भारताचा पाठिंबा