म्हैसूर - आशियातील सर्वात लांब सुळे असलेला म्हैसूरमधील व्याघ्र प्रकल्पाची शान असलेला भोगेश्वरा ( Elephant Bhogheshwara ) या हत्ती वयाच्या 70 व्या वर्षी जगाचा निरोप घेतला. भोगेश्वराच्या मृत्यूमुळे वन्यजीव प्रेमी हळहळले आहेत. आता भोगेश्वराच्या आठवणीच तेवढ्या उरल्या आहेत. भोगेश्वराला मिस्टर काबिनी नावानेही ओळखले जात असे. शक्तिमान ( Shaktimaan ) म्हणूनही त्याला संबोधले जात होते. काबिनी नदीच्या बॅकवॉटर क्षेत्रात असलेल्या व्याघ्र प्रकल्पात त्याचे वास्तव्य होते.
काबिनीच्या जलाशयाजवळ मृतावस्थेत आढळला - भोगेश्वरा हा भव्य हत्ती 11 जून रोजी बांदीपूर-नागरहोल राखीव जंगलातील काबिनी जलाशयाजवळ मृतावस्थेत आढळला होता. जमिनीला टेकणारे त्याचे लांब सुळे गेल्या दोन दशकांपासून पर्यटकांचे आकर्षण ठरले होते. हत्ती हा सर्व पर्यटकांच्या डोळ्यांचे पारणे फेडणारा होता कारण त्याला महाद्वीपातील सर्वात लांब दात होते. काबिनीचा शक्तिमान असेही नाव लोकांनी त्याला दिले होते. या अभयारण्याचा तो रहिवासी असल्याने येथील सर्वांना त्याचा अभिमान वाटत असे. आपल्या लांब सुळ्यांमधून सोंड आतबाहेर करीत डौलाने चालताना तो या अभयारण्याची शान वाटायचा.