नवी दिल्ली - राष्ट्रीय पातळीवर राजकारणात मोठी उलथापालथ घडली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आणि निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांची बुधवारी दिल्लीत भेट झाली. महिनाभरात ही दोघांमधील तिसरी भेट आहे. यापूर्वी प्रशांत किशोर व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष यांच्यात सोमवारी भेट झाली होती.
प्रशांत किशोर यांनी ११ जूनला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची मुंबईला भेट घेतली होती. तेव्हापासून चर्चा सातत्याने होत आहे. या आठवड्यांमध्ये दोघांमध्ये दोनदा भेट झाली आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे विरोधी पक्षांची मोट बांधत असल्याची चर्चा आहे.
हेही वाचा-जगात भारी मानली जाणारी 'फायझर लस' भारतीयांना मिळणार
या नेत्यांनी राष्ट्रमंचच्या बैठकीला लावली हजेरी-
मंगळवारी शरद पवार यांच्या निवासस्थांनी राष्ट्रमंचची बैठक झाली होती. या बैठकीत तृणमूल काँग्रेसचे नेते यशवंत सिन्हा, गीतकार जावेद अख्तर, राष्ट्रीय लोकदलाचे (आरएलडी) अध्यक्ष जयंत चौधरी, नॅशनल कॉन्फरन्सचे नेता उमर अब्दुल्ला, पूर्व जेडीयूचे नेता पवन वर्मा, सीपीआयचे खासदार विनॉय विश्वम आदी नेते सामिल होते. ही बैठक सुमारे दीड तास चालली होती.
हेही वाचा-तस्लीमा नसरीन यांचे इम्रान खान यांना जशाच तसे उत्तर; शर्टलेस फोटो केला टि्वट
यशवंत सिन्हा काय म्हणाले होते?
राष्ट्रमंचच्या बैठकीत शेतकऱ्यांचे प्रश्न, पेट्रोल व डिझेल दरवाढ आणि अर्थव्यवस्था अशा विविध मुद्द्यांवर चर्चा झाल्याचे राष्ट्रमंचाचे समन्वयक यशवंत सिन्हा यांनी म्हटले होते.
काँग्रेसच्या नेत्यांना बैठकीचे दिले होते निमंत्रण-
माजिद मेमन यांनी राष्ट्रमंचच्या बैठकीची माहिती दिली होती. ते म्हणाले, की राष्ट्रमंचची बैठक ही शरद पवारांनी भाजप विरोधात राजकीय बळ एकटविण्यासाठी बोलाविल्याचे काही माध्यमांतील वृत्त हे पूर्णपणे चुकीचे आहे. काँग्रेसच्या नेत्यांना बैठकीसाठी डावलले नाही. त्यांना बैठकीसाठी निमंत्रित करण्यात आले होते. मात्र, काँग्रेसचे नेते अभिषेक संघवी इत्यादींनी काही कारणास्तव येणार नसल्याचे कळविले आहे. बैठकीमधील अडीच तासांत महागाई, कोरोना परिस्थिती, इंधन दरवाढ अशा विविध समस्यांबाबत चर्चा करण्यात आल्याचे माजिद मेमन यांनी सांगितले.