नवी दिल्ली : निवडणूक आयोग आज सोमवारी राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींना 'रिमोट इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन'चा प्रोटोटाइप दाखवणार आहे. आयोगाने आठ मान्यताप्राप्त राष्ट्रीय पक्ष आणि 57 मान्यताप्राप्त राज्यस्तरीय पक्षांना सोमवारी देशांतर्गत आणि देशाबाहेर प्रवासी मतदारांचा सहभाग सुधारण्यावर चर्चा करण्यासाठी निमंत्रित केले आहे. त्याबाबतचे पत्रक निवडणूक आयोगाने काढले आहे. सर्व पक्षांना रिमोट व्होटिंग मशीनच्या वापरास परवानगी देण्यासाठी, आवश्यक बदल करण्यासारख्या मुद्द्यांवर विचार सादर करण्यास सांगितले होते. रिमोट व्होटिंग मशीनमुळे परदेशातील मतदारांना त्यांच्या मतदानाचा हक्क बजावण्यासाठी त्यांच्या मूळ जिल्ह्यात जाण्याची गरज भासणार नाही.
आरव्हीएम इव्हीएमची सुधारित आवृत्ती : निवडणूक आयोगाच्या अधिकार्यांनी दुर्गम मतदान केंद्रांवर कमी मतदान होण्याची समस्या दूर होईल अशी आशा व्यक्त केली आहे. यासोबतच, रिमोट व्होटिंग मशीनही सध्याच्या इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीनवर आधारित 'एक मजबूत, त्रुटी-मुक्त आणि प्रभावी स्टँड-अलोन सिस्टम' म्हणून विकसित केली जाईल आणि ती इंटरनेटशी जोडली जाणार नाही, असे म्हटले आहे. त्याशिवाय रिमोट व्होटिंग मशीन ही इव्हीएम मॉडेलची सुधारित आवृत्ती आहे. जी स्थलांतरितांना मतदान केंद्रांवर न जाता घरातूनच मतदान करण्यास उपयोगी ठरते. निवडणूक आयोगाने गेल्या महिन्यात सांगितले होते की हा उपक्रम राबवला तर स्थलांतरितांसाठी एक 'सामाजिक बदल' होऊ शकतो.
चर्चेतून मार्ग काढावा : त्यावर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह म्हणाले की, रिमोट इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीनच्या प्रस्तावाला विरोध करण्याचा निर्णय बहुतांश विरोधी पक्षांनी घेतला आहे. काँग्रेस, जनता दल (युनायटेड), भारतीय कम्युनिस्ट पार्टी (सीपीआय), कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया-मार्क्सिस्ट (सीपीआय-एम), नॅशनल कॉन्फरन्स, झारखंड मुक्ती या विरोधी पक्षांच्या बैठकीनंतर त्यांनी हे वक्तव्य केले. रिमोट व्होटिंग मशीनच्या प्रस्तावात मोठ्या प्रमाणात राजकीय विसंगती आहे, ज्यामध्ये स्थलांतरितांची व्याख्या स्पष्ट नाही, असे दिग्विजय सिंह म्हणाले. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मत मांडताना रिमोट व्होटिंग मशीनच्या प्रस्तावावर सामूहिक निर्णय घेण्यात यावा, आयोगाच्या सोमवारी होणाऱ्या ब्रीफिंगनंतर सिस्टीममध्ये काही त्रुटी आढळल्यास त्याचाही विचार करावा असे म्हटले. त्याशिवाय दिल्लीत या विषयावर चर्चा करण्यासाठी सर्व राजकीय पक्षांची बैठक दिग्विजय सिंह यांनी बोलावली असल्याची माहिती दिली.
हेही वाचा : Mangal Prabhat Lodha : मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी राजस्थानात घेतली मृतक कन्हैयालालच्या कुटुंबियांची भेट