नवी दिल्ली - केंद्रीय निवडणूक आयोगाची आज (गुरुवारी) साडेचार वाजता पत्रकार परिषद होणार आहे. या निवडणुकीत पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांची घोषणा होण्याची शक्यता आहे. पश्चिम बंगाल, आसाम, केरळ, तामिळनाडू, पुद्दुचेरीच्या विधानसभा निवडणुका नियोजित आहेत. मात्र, अद्याप याबाबत आयोगाने कोणतीही घोषणा केली नाही. एप्रिल-मे महिन्यात निवडणुका होण्याची शक्यता आहे. या पत्रकार परिषदेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
राजकीय पक्षांची प्रचारास सुरुवात -
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका होत आहेत. त्यासाठीची तयारी निवडणुक आयोगाने सुरू केली आहे. देशात कोरोना पुन्हा डोके वर काढू लागल्याने गर्दी न करता निवडणुका घेणे हे आयोगापुढे मोठे आव्हान आहे. बंगाल, केरळ, आसाम आणि तामिळनाडू या मोठ्या राज्यात राजकीय पक्षांनी प्रचाराला सुरूवात केली आहे. भाजपाचे नेते आणि केंद्रीय मंत्री मागील काही दिवसांपासून सतत पश्चिम बंगाल आणि आसामच्या दौऱ्यावर आहेत. राहुल गांधींही केरळच्या दौऱ्यावर गेले आहेत.