पाटणा : बिहारमध्ये भूकंपाचे धक्के बसले ( Earthquake in Bihar ) आहेत. सकाळी आठच्या सुमारास भूकंपाचे धक्के जाणवले. पाटणा, किशनगंज, पूर्णिया, कटिहार, मुझफ्फरपूर, पूर्व चंपारण, पश्चिम चंपारण, समस्तीपूर आणि मधेपुरासह अनेक जिल्ह्यांमध्येही भूकंपाचे धक्के जाणवले. या भूकंपाचा मध्यबिंदू काठमांडूच्या आग्नेय-पूर्वेकडे १४७ किमी अंतरावर होता. बिहारमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले असले तरी कुठलीही हानी झाल्याचे वृत्त नाही.
सकाळी ७.५८ वाजता भूकंप : मिळालेल्या माहितीनुसार, नेपाळमधील काठमांडूमध्ये रविवारी सकाळी ७.५८ वाजता भूकंपाचे धक्के जाणवले. त्याची तीव्रता रिश्टर स्केलवर 5.5 इतकी होती. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीच्या म्हणण्यानुसार, राजधानी काठमांडूच्या पूर्व-दक्षिणपूर्वेस १४७ किमी अंतरावर भूकंपाचा मध्यबिंदू होता.
बिहारच्या अनेक शहरात धक्का जाणवला : पाटणा हवामान केंद्राचे संचालक विवेक सिन्हा यांनी सांगितले की, रविवारी सकाळी ७.५८ वाजता भूकंप झाला. बिहारमधील अनेक शहरांमध्ये लोकांना ते जाणवले आहेत. रिश्टर स्केलवर त्याची तीव्रता 5.5 इतकी आहे. भारत, चीन आणि नेपाळमधील अनेक शहरांमध्ये भूकंपाचे हे धक्के जाणवले आहेत.
पूर्णियातही भूकंप - सकाळी ८.१० च्या सुमारास पूर्णियामध्येही भूकंपाचे धक्के जाणवले. जेव्हा आजूबाजूच्या वस्तू हलू लागल्या तेव्हा समजले की हा भूकंप आहे. त्यानंतर नागरिक जीवाच्या भीतीने घराबाहेर पडले.
याआधीचा भूकंपाचा धक्का खूप मोठा - नेपाळला 2015 मध्ये येथे मोठा भूकंप झाला होता. 25 एप्रिल 2015 रोजी सकाळी 11:56 वाजता नेपाळमध्ये भूकंपाचे तीव्र धक्के जाणवले. 2015 मधील भूकंपाची तीव्रता 7.8 इतकी होती. भूकंप इतका मोठा होता की, भारतातील अनेक राज्यांमध्ये भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले. 9000 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला होता. या भूकंपामुळे 8 दशलक्षाहून अधिक लोक प्रभावित झाले आहेत.