कोची - यंदा केरळमध्ये विधानसभा निवडणुका होणार असून मेट्रो मॅन नावाने प्रसिद्ध असलले ई श्रीधरन भाजपामध्ये प्रवेश करणार आहेत. यातच त्यांनी आपण केरळचे मुख्यमंत्री पद सांभाळण्यासाठी पूर्णपणे तयार असल्याचे म्हटलं. त्यांना राज्यपाल पदासाठी विचारणा करण्यात आली होती. मात्र, त्यांनी नकार दिल्याची माहिती आहे.
राज्यात भाजपाला सत्तेत आणण्यासाठी राजकीय प्रवेश करत आहे. राज्याच्या हितासाठी मी काम करेल. केरळमध्ये भाजपा सत्तेत आल्यास मुख्यमंत्री होण्यासाठी मी तयार आहे. राज्यात आधारभूत संरचना विकसीत करण्याकडे माझा कल असेल, असे ते म्हणाले. तसेच आपल्याला राज्यपाल पदासाठी विचारणा करण्यात आली होती. मात्र, मी नकार दिला होता. कारण, राज्यपाल हे सवैंधानिक पद आहे. त्या पदाला काही अधिकार नसल्याने मी राज्यासाठी कोणतेच योगदान देऊ शकणार नाही, असे त्यांनी सांगितले.
केरळात भाजपाकडून 21 फेब्रुवारीला विजय यात्रा काढण्यात येणार आहे. या विजय यात्रेदरम्यान ई श्रीधरन औपचारिकरित्या भाजपामध्ये प्रवेश करतील. केरळ प्रदेशाध्यश्र के सुरेंद्रन यांनी ही माहिती दिली.
कोण आहेत ई श्रीधरन -
स्थापत्य अभियंता असणारे ई श्रीधरन कोलकाता ते दिल्ली मेट्रोसाठी मोठं योगदान दिलं आहे. तसेच दिल्ली मेट्रो अंमलबजावणीतही त्यांचा सिंहाचा वाटा आहे. श्रीधरन हे 1995 ते 2012 पर्यंत दिल्ली मेट्रोचे संचालक होते. मेट्रोमधून प्रवास करणं हे एक स्वप्न होतं. ते स्वप्न श्रीधरन यांनी सत्यात उतरवलं. त्यांच्या कामाच्या शैलीने सर्वांना प्रभावित केलं आहे. प्रत्येक काम वेळेच्या आत पूर्ण करणं हे त्यांच वैशिष्ट्य आहे. विकासकामांमधील योगदानासाठी त्यांना फ्रान्सने 'नाईट ऑफ दी लिजन ऑफ ऑनर' पुरस्काराने सम्मानित केले होते. तर भारत सरकारनं त्यांच्या कामासाठी ई. श्रीधरन यांना 2001 मध्ये पद्म आणि 2008 मध्ये पद्म विभूषण पुरस्काराने सम्मानित केले होते. तर टाईम मासिकाने त्यांना 'आशिया हिरो' असे संबोधले होते. याचबरोबर जपानने देखील त्यांना 2013 मध्ये ऑर्डर ऑफ रायझिंग सन पुरस्काराने गौरवलं होतं.
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक निकाल -
केरळमध्ये यंदा विधानसभा निवडणुकांचा बार उडणार आहे. नुकतचं केरळमध्ये स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका पार पडल्या आहेत. केरळमधील स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकांमध्ये 941 ग्रामपंचायत आणि 14 जिल्हा परिषदांमध्ये सत्तारुढ डाव्या आघाडीने मोठा विजय मिळवला. 10 जिल्हा परिषद, 152 पंचायत समित्यांमध्ये सीपीएमच्या नेतृत्वातील एलडीएफला विजय मिळाला आहे. तर भाजपने 23 ग्रामपंचायतीमध्ये विजय मिळवला.
केरळ विधानसभा निवडणूक -
केरळ विधानसभा निवडणूक 2016 मध्ये पार पडली. 16 मे 2016 रोजी एकाच फेरीत घेण्यात आलेल्या या निवडणुकीमध्ये केरळ विधानसभेमधील सर्व 140 जागांसाठी आमदार निवडले गेले. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या नेतृत्वाखालील डाव्या आघाडीने 91 जागांवर विजयासह संपूर्ण बहुमत मिळवले व काँग्रेस पक्षाची सत्ता संपुष्टात आणली. या निवडणुकीत प्रथमच भाजपला केरळमध्ये एका जागेवर विजय मिळाला.