Snake Bite Viral Video : दारूच्या नशेत खेळत होता सापाशी, सापाने केले असे काही.. - दारूच्या नशेत साप चावल्याने मृत्यू
बिहारमध्ये एक व्यक्ती दारूच्या नशेत विषारी सापाचे वारंवार चुंबन घेत होता. त्याचे हे कृत्य मात्र आता त्याच्या जीवावर बेतले आहे. साप चावल्याने त्या व्यक्तीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. पोलिसांचा या प्रकरणी तपास सुरू आहे.
नवादा (बिहार) : बिहारच्या नवादामध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. येथे एका मद्यधुंद तरुणाने एक विषारी साप पकडला. त्याचे हे कृत्य पाहून गावकरी आरडाओरडा करत होते, पण तो तरुण एवढा नशेत होता की त्याला कोणाचाच इशारा समजत नव्हता. त्याने बेधडकपणे विषारी सापाचे चुंबन घेतले. मात्र त्याची ही कृती आयुष्यातील शेवटची ठरली!
पुन्हा पुन्हा सापाचे चुंबन घेत होता : व्हिडीओत दिसणाऱ्या या व्यक्तीचे नाव दिलीप यादव असे आहे. व्हायरल व्हिडिओमध्ये ओरडण्याचा आवाजही ऐकू येत आहे. काही लोक मोठमोठ्याने ओरडून त्या व्यक्तीला सापापासून दूर राहण्यास सांगत आहेत. पण तो व्यक्ती बेफिकीर दिसतो आहे. व्हिडिओत तो वारंवार विषारी सापाचे चुंबन घेताना दिसतो आहे. या व्हायरल व्हिडीओनंतर नवादा जिल्ह्यातील नारायणपूर गावातून एका व्यक्तीचा सर्पदंशाने मृत्यू झाल्याची बातमी समोर आली. आता ती व्यक्ती दिलीप यादवच होती, असे म्हटले जात आहे. जेव्हा त्याने सापाला पकडून ठेवले होते तेव्हा तो पुन्हा पुन्हा सापाचे चुंबन घेत होता. त्याचवेळी त्याला विषारी सापाने दंश केला असल्याची शक्यता आहे.
पोलिसांनी मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवला : दिलीप यादव याला सापाच्या विषाची लागण झाल्याने तो बेशुद्ध पडला. स्थानिक लोकांनी त्याला गोविंदपूर रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. गोविंदपूर पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी मृत व्यक्तीचे शवविच्छेदन करून मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात देण्याचे सांगितले. गोविंदपूर पोलिस ठाण्याचे प्रभारी श्याम पांडे म्हणाले की, ' या घटनेने कुटुंबीय दुखावले आहेत. तो व्यक्ती दारूच्या नशेत असल्याचे लोकांनी सांगितले. लोक त्याला तसे करण्यास मनाई करत होते पण तो कोणाचेच ऐकत नव्हता. लोकांच्या म्हणण्यानुसार त्याला साप चावला आहे. त्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. तपासानंतर मृत्यू कसा झाला हे स्पष्ट होईल.'