पुलवामा - जम्मू-काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यातील राजपुरा भागात रात्री उशिरापासून दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक सुरू आहे. या चकमकीत एका दहशतवाद्याला जवानांनी कंठस्नान घातले. तर यात दुखद बाद म्हणजे एक जवानही हुतात्मा झाला आहे.
परिसरात तीन ते चार दहशतवादी लपून बसल्याची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दलांच्या (सैन्य, पोलीस आणि सीआरपीएफ) संयुक्त पथकाने राजपुरा परिसरातील हंजन गावाला घेराव घातला. शोधमोहीम सुरु असताना दहशतवाद्यांनी सुरक्षा दलाच्या पथकावर गोळीबार केला. यावर सुरक्षा दलानेही चौख प्रत्युत्तर दिले. यात एक दहशतवादी ठार झाला. मात्र, एक जवानही हुतात्मा झाला. तर ऑपरेशन सुरू असून चार दहशतवाद्यांना पथकाने घेरले आहे. तर दुसरीकडे भारत-पाकिस्तान सीमेवर अलीकडच्या काळात ड्रोनच्या कारवाया वाढल्या आहेत. लष्कारासमोर ड्रोनचे नवे आव्हान उभं राहिले आहे.
जम्मू-काश्मीरच्या सीमेवर्ती भागातील अरनिया सेक्टरमध्ये आज पहाटे 4:25 च्या सुमारास पाकिस्तानी ड्रोन दिसला. सीमेवर तैनात असलेल्या बीएसएफच्या जवानांनी हे पाहताच गोळीबार केल्यावर ड्रोन माघारी परतला. गेल्या रविवारी जम्मूमधील जम्मू विमानतळावरील भारतीय हवाई दलाच्या तळावर दोन ड्रोनद्वारे बॉम्बहल्ला झाला होता. प्राथमिक तपासात याचा संबध एलईटीशी असल्याचे समोर आले आहे. जम्मूच्या हिरानगर सेक्टरमध्ये गेल्या वर्षी जूनमध्ये सुरक्षा दलाने असाच एक ड्रोन खाली पाडला होता.
ड्रोनमुळे लष्कराची डोकेदुखी वाढली -
दहशतवाद विरोधी मोहीम हाती घेतल्यानंतर दहशतवाद्यांना हत्यारे आणि दारू गोळ्याची कमतरता भासू लागली होती. मात्र, ड्रोनच्या माध्यमातून तस्करी सुरू झाल्याने त्यांच्याकडे मोठ्याप्रमाणात रसद पुरवठा होऊ लागला आहे. परिणामी लष्कराची डोकेदुखी वाढू लागली आहे. तस्करीसाठी शुत्रराष्ट्रांकडून वापरण्यात येणारे ड्रोन बाजारात सहज उपलब्ध होतात. ते कोणीही खरेदी करू शकते. यामध्ये प्रत्येक ड्रोनच्या माध्यमातून अनेक बंदूका किंवा किलोपेक्षा जास्त ड्रग्स तस्करी केली जाऊ शकते. याशिवाय भारतीय सैनिकांच्या ठाव-ठिकाण्याचाही या ड्रोनच्या कॅमेऱ्याच्या माध्यमातून शोध लावता येतो. ड्रोनचा दहशतवादी कारवाया आणि घुसखोरीसाठी वापर केला जातो.
हेही वाचा - पुलवामा : दहशतवाद्यांचा घरात घुसून गोळीबार; माजी पोलीस अधिकारी आणि पत्नीचा मृत्यू