हैदराबाद Digital Payment : अलीकडच्या काळात रोखीचे व्यवहार ९० टक्क्यांपर्यंत घसरले आहेत. पैशाचं पाकीट विसरलं, रिकामं असलं तरी काही काळजी नाही, कारण सर्व कामं डिजिटल पेमेंटनं होतात. सरकारी सेवा आणि वेबसाइट्सवर देखील डिजिटल पेमेंट सामान्य बाब झाली आहे. हीच परिस्थिती सर्वत्र आहे, केवळ एक अपवाद वगळता, तो म्हणजे आंध्र प्रदेश! राज्यातील दारूच्या दुकानांसह सरकारनं आता परिवहन बसेसमध्येही डिजिटल पेमेंटवर बंदी घातली आहे. तसंच, आरक्षण काउंटरवर देखील 'कॅश ओन्ली' असे फलक दिसत असल्यानं प्रवाशांचे हाल होत आहेत.
तिकीट बुकिंगसाठी डिजिटल पेमेंट बंद : आंध्र प्रदेशातील बसेसमध्ये तसेच आरक्षण काउंटरवर डिजिटल पेमेंट दुर्मीळ झालं आहे. आशियातील सर्वात मोठं बसस्थानक असलेल्या विजयवाडा येथे ऑनलाइन पेमेंट करणं कठीण चाललंय. व्यवस्थापनानं येथील डिजिटल सेवा दीड वर्षापासून बंद केलीये. तिकीट बुकिंग काउंटरवर फक्त रोख सेवा पुरवल्या जातात. यामुळे कॅशसाठी प्रवासी जवळच्या एटीएम केंद्रांकडे धाव घेत आहेत. RTC वेबसाइटवरही डिजिटल पेमेंट अनेकदा अयशस्वी होत असल्यानं प्रवाशांची फार गैरसोय होत आहे.
डिजिटल पेमेंट सुविधा देण्याची प्रवाशांची मागणी : एवढं असूनही, आरटीसीचे व्यवस्थापन कर्मचारी मात्र प्रवाशांच्या चिंतेकडे अजिबात लक्ष देत नाहीत. प्रवासी डिजिटल पेमेंट सुविधा देऊन काउंटर वाढवण्याची मागणी सातत्यानं करत आहेत, मात्र त्याकडे आरटीसीच्या अधिकाऱ्यांचं लक्ष नाही. डिजिटल पेमेंट काम करत नसल्यानं अनेक प्रवासी नाईलाजानं तेलंगणा बस किंवा खासगी ट्रॅव्हल्सचा अवलंब करतात. यामुळे स्थानिक सरकारच्याच महसूलात घट होतो आहे.
दारू दुकानांमध्ये हीच बोंब : राज्यभरातील दारू दुकानांमध्ये आजही रोखीनं व्यवहार सुरू आहेत. भाजपा प्रदेशाध्यक्ष पुरंदेश्वरी यांनी काही दिवसांपूर्वी पश्चिम गोदावरी जिल्ह्यातल्या नरसापुरम येथील एका दारूच्या दुकानात जाऊन व्यवहारांची माहिती घेतली. तेव्हा तेथे त्यांना जवळपास एक लाख रुपयांच्या व्यवहारात केवळ ७०० रुपयांचं डिजिटल पेमेंट झाल्याचं आढळून आलं. ही परिस्थिती केवळ नरसापुरमपुरती मर्यादित नाही. राज्यभरातील ३,७०८ दारू दुकानांमध्ये हीच बोंब आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या डिजिटल इंडियाच्या स्वप्नाला आंध्र प्रदेशात मात्र ब्रेक मिळाल्याचं तुर्तास दिसते आहे.
हेही वाचा :