नवी दिल्ली - हॉटेलकडून जेवणाची ऑर्डर पॅक करायला उशीर होत असल्याचा राग आल्याने स्विगीच्या डिलिव्हरी बॉयने थेट हॉटेल मालकावरच बंदुकीने गोळ्या झाडल्याचा प्रकार समोर आला आहे. नोएडामध्ये हा धक्कादायक प्रकार घडला आहे. घटनेनंतर हॉटेल मालकाला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
हेही वाचा - मुंबईतील भुजबळांचे घर कोणाचे हे मुख्यमंत्री व शरद पवारांनी सांगावे, किरीट सोमैय्यांचे आव्हान
काय आहे प्रकरण?
मिळालेल्या माहितीनुसार, रात्री साडेबारा वाजण्याच्या सुमाराला हा डिलिव्हरी बॉय हॉटेलमध्ये जेवणाची ऑर्डर घेण्यासाठी आला होता. मात्र, ऑर्डरचे पॅकिंग करायला उशीर होत असल्याच्या कारणावरून त्याची हॉटेलमधील वेटरसोबत वाद झाला. त्यानंतर मध्यस्थी करायला आलेल्या हॉटेल मालकाची डिलिव्हरी बॉयने गोळ्या घालून हत्या केली.
दरम्यान, घटनास्थळी पोलीस दाखल झाले. याप्रकरणी गुन्हा दाखल झाला असून, तपासासाठी पोलिसांच्या तीन टीम तयार करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.
नोएडा परिसरात सुनील अग्रवाल यांचा झमझम किचन नावाचा ऑनलाईन फूड डिलिव्हरीचा व्यवसाय आहे. या ठिकाणी साडे बारा वाजता एक ऑर्डर आली होती. ही ऑर्डर घेण्यासाठी डिलिव्हरी बॉय जेव्हा दाखल झाला, तेव्हा केवळ चिकन बिर्याणी तयार होती आणि पुरीभाजी तयार करण्याचं काम सुरु होते. पुरीभाजी अजूनही पॅक का केली नाही, अशी विचारणा करत डिलिव्हरी बॉयनं भांडण सुरु केले. त्यातच त्याने हॉटेल मालकावर बंदुकीने गोळ्या झाडल्या. यात हॉटेल मालकाचा मृत्यू झाला आहे.