लेह - चीनशी झालेल्या करारानुसार पूर्व लडाखच्या पँगाँग तलाव परिसरातून सैन्याने माघार घेतली आहे. मात्र, चीनच्या हालचालींवर भारतीय लष्काराची बारीक नजर आहे. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह लडाखच्या तीन दिवसीय दौऱ्यावर आहेत. आज त्यांच्या दौऱ्याचा दुसरा दिवस असून रविवारी त्यांनी लष्कर प्रमुखांची भेट घेत संवाद साधला. यावेळी सैन्य दलातील जवानांनी 'भारत माता की जय' घोषणाबाजीही केली. आज ते रणनीतिकदृष्ट्या महत्त्वपूर्ण पुलांचे उद्घाटन करणार आहेत.
आज राजनाथ सिंह सीमा रस्ते संघटनेच्या काही प्रकल्पांचे उद्घाटन करणार आहेत. यावेळी त्यांच्यासमवेत लष्करप्रमुख जनरल मुकुंद नरवणे हे देखील असणार आहेत. त्यानंतर ते तज्ञांशी चर्चा करणार असून पूर्व लडाखमधील परिस्थितीचा आढावा घेणार आहेत. भारताच्या आतापर्यंत चीनबरोबर चर्चेच्या 11 फेऱ्या पार पडल्या आहेत. मात्र, चीनचा आडमुठेपणा कायम आहे. या पार्श्वभूमीवर सिंह यांची ही भेट सैनिकांचे मनोबल वाढवण्यास उपयुक्त ठरणार आहे.
बीआरओकडून मिळालेल्या माहितीनुसार, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे जौलजीबी-मुनस्यारी रोडवरील जौनालीगड नाल्यातील 70 मीटर स्पॅन मोटर पुलाचे उद्घाटन करतील. त्याशिवाय अन्य तीन पुलांचेही उद्घाटन यावेळी करण्यात येणार आहे. रणनीतिकदृष्ट्या या पुलाचे महत्त्व आहे. या पुलांमुळे लष्कराला चीन सीमेपर्यंत पोहोचणे सोपे होईल. एवढेच नाही तर सीमान्त नागरिकांना वाहतुकीची सुविधाही मिळणार आहे. पायाभूत सुविधा विकसित करण्यात हे पूल महत्त्वपूर्ण भूमिका बजावू शकतात.
सैन्याचे मनोबल वाढविण्याचा प्रयत्न -
जौलजीबी-मुनस्यारी रोडवरील जौनालीगड येथे 6.5 कोटी रुपये खर्चून 70 मीटर लांबीचा पूल बांधला गेला आहे. तर तावघाट-घाटियाबागड रोडवरील जंगीगड येथे 140 फूट ट्रिपल सिंगल रीइंसफोर्स्ड बैली ब्रिज, जौलजीबी-मुनस्यारी रोडवरील किरकुटिया नाल्यावर 180 फूट डबल-डबल रीइंसफोर्स्ड बैल ब्रिज आणि मुनस्यारी-बोगडियार-मिलम मोटर रोडवरील लस्पा नाल्यावर 140 फूट फीट डबल-डबल रीइंसफोर्स्ड बैली ब्रिज बांधला गेला आहे, असे बीआरओचे डायमंड प्रोजेक्टचे मुख्य अभियंता एमएनव्ही प्रसाद यांनी सांगितले. संरक्षणमंत्री चीनशी सुरू असलेल्या तणावावर पूर्व लडाखमधील भारताच्या तयारीचा सर्वंकष आढावा घेतील. सैन्याचे मनोबल वाढविण्यासाठी लष्काराच्या तळांना भेट देतील.
हेही वाचा - येत्या काळात भारत जगातील पहिल्या तीन नौदल शक्तींपैकी एक असेल; राजनाथ सिंह यांनी व्यक्त केला विश्वास