नवी दिल्ली - हवाई दलाच्या हेलिकॉप्टरचा बुधवारी तामिळनाडूत अपघात ( CDS General Bipin Rawat helicopter crash ) झाला. या अपघातात सीडीएस बिपीन रावत यांच्यासह त्यांच्या पत्नी व इतर 12 लष्कर अधिकाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. बिपिन रावत (Bipin Rawat) हे देशातील पहिले CDS अधिकारी म्हणजेच चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ आहेत. सीडीएसचे काम लष्कर (Army), हवाई दल (Air Force) आणि नौदल (Navy) यांच्यात समन्वय साधणे आहे. संरक्षण मंत्र्यांच्या प्रमुख सल्लागारांपैकी ते एक होते. तिन्ही सैन्यांमध्ये समन्वय साधण्याचे महत्त्वाचे काम बिपीन रावत यांच्याकडे होते. या अपघाताविषयी आज देशाचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी संसदेत ( Defence Minister on CDS Helicopter Crash in Lok Sabha ) निवेदन दिले. यावेळी राजनाथ सिंह यांनी नेमके अपघातावेळी काय घडले, याविषयी देखील लोकसभेत सविस्तर माहिती दिली.
अवघ्या २० मिनिटांनी हेलिकॉप्टरसोबतचा संपर्क तुटला -
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी लोकसभेत दिलेल्या माहितीनुसार, हेलिकॉप्टरचा उड्डाण कालावधी अवघा २७ मिनिटांचा होता. ११ वाजून ४८ मिनिटांनी हेलिकॉप्टरने उड्डाण घेतले. हे हेलिकॉप्टर १२ वाजून १५ मिनिटांनी वेलिंग्टन येथे पोहोचणार होते. मात्र १२ वाजून ८ मिनिटांनी म्हणजेच उड्डाण घेतल्यानंतर अवघ्या २० मिनिटांनी हेलिकॉप्टरसोबतचा संपर्क तुटला, दरम्यान, काही स्थानिकांनी जंगलातून धुराचे लोट येताना दिसले. त्याकडे सर्वांनी धाव घेतली. यावेळी त्यांना एक हेलिकॉप्टरचा अपघात झाल्याचे दिसले व त्यांनी जखमींना वेलिंग्टनच्या मिलिटरी हॉस्पिटलमध्ये दाखल केले. यावेळी घटनास्थळावर लष्करही मदतीसाठी पोहोचले होते. त्यांनी सर्वांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. या अपघातात सीडीएस बिपीन रावत यांच्यासह त्यांच्या पत्नी व इतर 12 लष्कर अधिकाऱ्यांचा मृत्यू झाला. तर ग्रुप कॅप्टन वरुण सिंग हे जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार असे त्यांनी सांगितले.
पूर्ण लष्करी सन्मानाने सीडीएस जनरल बिपीन रावत यांच्यावर होणार अंत्यसंस्कार -
सीडीएस जनरल बिपीन रावत यांच्यावर पूर्ण लष्करी सन्मानाने अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. तसेच लष्करी जवानांचे अंतिम संस्कार योग्य लष्करी सन्मानाने केले जातील अशी माहिती ही राजनाथ सिंह यांनी तामिळनाडूतील लष्करी हेलिकॉप्टर दुर्घटनेवर लोकसभेत दिलेल्या निवेदनात दिली आहे.
अपघातातील जखमी ग्रुप कॅप्टन वरुण सिंग लाइफ सपोर्टवर -
ग्रुप कॅप्टन वरुण सिंग हे वेलिंग्टनच्या मिलिटरी हॉस्पिटलमध्ये लाइफ सपोर्टवर आहेत. त्यांचा जीव वाचवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत. अशी माहितीही लोकसभेतील निवेदनात राजनाथ सिंह यांनी दिली.
एअर मार्शल मानवेंद्र सिंग करणार त्रि-सेवा चौकशी -
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह लोकसभा दिलेल्या निवेदनात सांगितले की, भारतीय वायुसेनेने (IAF) लष्करी हेलिकॉप्टर अपघाताची त्रि-सेवा चौकशी चे ( Indian Air Force ordered tri-service inquiry ) आदेश दिले आहेत. या तपासाचे नेतृत्व एअर मार्शल मानवेंद्र सिंग करणार आहेत. चौकशी पथक कालच वेलिंग्टनला पोहोचले आणि तपास सुरू केला आहे, असे ते म्हणाले.
हेही वाचा - CDS Bipin Rawat Death : आता कोण लष्करप्रमुख जनरल नरवणे होणार चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ?