नवी दिल्ली - प्रजास्ताक दिनी कृषी कायद्यांच्याविरोधात ट्रॅक्टर रॅली काढण्यात आली होती. यावेळी परेडमध्ये हिंसा झाली. या हिंसेचा दिल्ली गुन्हे शाखेकडून तपास सुरू आहे. लाल किल्ल्यावर खालसा झेंडा फडकवल्यानंतर आपल्या समर्थकांसह दीप सिद्धू इंडिया गेटवर जाणार होता. हे चौकशीदरम्यान समोर आले आहे.
लाल किल्ला हिंसाचारातील मुख्य आरोपी दीप सिद्धूला पोलिसांनी अटक केली आहे. शनिवारी दीप सिद्धू आणि इक्बाल सिंग यांच्यासह दिल्ली पोलिसांनी लाल किल्ल्यावर क्राइम सीन रिक्रिएट केला. हिंसाचारादरम्यान ते लाल किल्ल्यापर्यंत कसे पोहचले व त्यांनी नेमकं काय काय केलं. कोणत्या मार्गाने ते आले होते. हे दिल्ली गुन्हे शाखेच्या पोलिसांना जाणून घ्यायचं आहे.
लाल किल्ल्यावर खालसा झेंडा फडकवल्यानंतर आपल्या समर्थकांसह दीप सिद्धू इंडिया गेटवर जाणार होता. मात्र, हिंसा पसरल्यानंतर तो लाल किल्ल्यावरूनच परतला, असे चौकशीत दीप सिद्धूने सांगितले.
हिंसाचार करण्याचा हेतू नव्हता -
कृषी कायद्यांच्या विरोधात शेतकऱयांनी दिल्लीकडे कूच केली. तेव्हा दीप सिद्धू शेतकर्यांसह 27 नोव्हेंबरला दिल्लीला आला होता. नंतर तो परत घरी गेला. यानंतर, पुन्हा 26 जानेवारीपूर्वी तो दिल्लीमध्ये आला. तेव्हा त्याने ट्रॅक्टर रॅलीमधून लाल किल्ल्यावर जाण्याचा निश्चय केला होता. हिंसा करण्याचा आपला कोणताही हेतू नव्हता. जर कोणताही हिंसाचार झाला नसता. तर आम्ही इंडिया गेटलाही गेले असतो, असे सिद्धूने चौकशीदरम्यान सांगितले.
मुख्य सुत्रधाराचा शोध सुरू -
दीप सिद्धू, सुखदेव सिंग आणि इक्बाल सिंग यांना पोलिसांनी रिमांडवर घेतले आहे. त्यांच्यामार्फत, लाल किल्ल्याच्या हिंसाचाराचे कट रचणाऱ्या सुत्रधारांपर्यंत पोहोचण्याचा गुन्हे शाखा प्रयत्न करीत आहे. हिंसाचार करण्यात या तिघांचा सहभाग आहे. परंतु दुसर्या व्यक्तीच्या सांगण्यावरून त्यांनी हिंसाचार घडवला असल्याचे पोलिसांचे मत आहे. यासंदर्भात आरोपींची चौकशी केली जात आहे. या हिंसाचाराचे मुख्य षडयंत्रकारी कोण होते, हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला जात आहे.
लाल किल्ल्यावर आंदोलकांचा कब्जा -
ट्रॅक्टर रॅलीला अचानक हिंसक वळण लागले होते. काही शेतकरी मोर्चाचा नियोजित मार्ग सोडून लाल किल्ल्याच्या दिशेने गेले होते. यात दीप सिद्धूचाही सहभाग होता. पाहता पाहता आंदोलकांनी लाल किल्ल्यावर कब्जा केला. तसेच निशाण ए साहीब हा शिखांचा धार्मिक ध्वज फडकावला. दीप सिद्धूने भडकावल्यामुळे आंदोलक लाल किल्ल्याकडे गेले असा आरोप त्याच्यावर होत आहे.