नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज जम्मू काश्मीरमध्ये आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा (AB-PMJAY SEHAT) शुभारंभ केला. यावेळी संबोधीत करताना त्यांनी काँग्रेस नेता राहुल गांधी यांना लक्ष्य केले आहे. भारतात लोकशाही राहिली नाही, राहुल गांधींच्या या विधानावरून मोदींनी त्यांच्यावर टीका केली. दिल्लीत बसलेले काही लोक मला लोकशाहीचा धडा शिकवण्याचा प्रयत्न करीत आहेत, असे मोदी म्हणाले.
दिल्लीत असे लोक आहेत. जे नेहमीच माझा तिरस्कार करतात आणि माझा अपमान करतात. मला लोकशाहीचा धडा शिकवण्याचा प्रयत्न करतात, असे मोदी म्हणाले. पुडुचेरीमध्ये सुप्रीम कोर्टाचे आदेश असूनही पंचायत आणि नगरपालिका निवडणुका होत नाहीत. पुडुचेरीमध्ये 2006 ला स्थानिक संस्था मतदान घेण्यात आले होते. त्यांची सत्ता असेलेल्या राज्यात लोकशाहीचे पालन केले जात नाही आणि हेच लोक मला लोकशाहीचा धडा शिकवण्याचा प्रयत्न करत आहेत, असे मोदी म्हणाले.
मोदींकडून जनतेचे अभिनंदन -
'लोकशाही मजबूत करण्यासाठी मी जम्मू-काश्मीरच्या जनतेचे अभिनंदन करतो. जिल्हा विकास परिषद (डीडीसी) निवडणुकीत तरुण ते वृद्धांनी मतदानाचा हक्क बजावला. डीडीसी निवडणुकीत जम्मू-काश्मीरच्या जनतेने लोकशाहीची मुळे मजबूत केली आहेत, असे मोदी म्हणाले.
डीडीसी निवडणुका -
जम्मू-काश्मीरमधील 20 जिल्ह्यात डीडीसी निवडणुका घेण्यात आल्या आहेत. ज्यामध्ये फारुख अब्दुल्ला यांच्या नेतृत्वाखालील गुपकर गठबंधन आणि काँग्रेसने 13 जिल्ह्यात विजय मिळविला. तर जम्मूच्या 6 जिल्ह्यांमध्ये भाजपाने बाजी मारली.